For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भटकलेल्या मनाला तेथून काढून पुन्हा नामस्मरणाला लावणे म्हणजे अभ्यास होय

06:30 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
भटकलेल्या मनाला तेथून काढून पुन्हा नामस्मरणाला लावणे म्हणजे अभ्यास होय
Advertisement

भगवंत म्हणाले, अर्जुना मृत्यूसमयी माणसाचे मन ज्या गोष्टीभोवती स्थिर झालेले असते, त्या गोष्टीत तो रुपांतरीत होतो. ज्या वस्तूचे स्मरण करत मनुष्य अंतकाली देहत्याग करतो, त्या वस्तूवर त्याचे चित्त एकाग्र झाल्याने तो तीच वस्तू होतो. त्याप्रमाणे मला अंतकाळी जे आठवतात, ते माझ्यासारखेच होतात. म्हणून तू नेहेमी माझेच स्मरण कर. ह्या अर्थाचा म्हणूनि सगळा काळ मज आठव झुंज तू । मन बुद्धि समर्पूनि मज नि:शंक पावसी ।। 7 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. भगवंत पुढे म्हणतात, मृत्यूसमयी माझी आठवण व्हावी म्हणून सदैव माझे स्मरण करत कर्तव्य करत रहा. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संशय मजप्रतच येशील. संत मंडळी अशा पद्धतीने देवाचे नाव घेत काम करत करत प्रत्येक गोष्टीत देवाला पहात असत. संत सावता माळी नामस्मरणात इतके दंग होत असत की, त्यांना सगळीकडेच ईश्वराचे दर्शन घडत असे. त्यांनी घेतलेल्या अनुभूतीबद्दलचा पुढील अभंग प्रसिद्ध आहे.

Advertisement

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।। 1 ।। लसूण मिरची कोथिंबिरा।अवघा झाला माझा हरी ।। 2।। मोट नाडा विहीर दोरी ।अवघी व्यापिली पंढरी ।। 3 ।। सावता म्हणे केला मळा । विठ्ठ्ला पायीं गोंविला गळा ।। 4 ।।

माउली पुढे म्हणतात, जो मनबुद्धि ईश्वराच्या स्वरूपात अर्पण करेल तो त्याच्याशी एकरूप होईल. संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात म्हणून त्यांच्या विचारांशी जो एकरूप होईल तो ईश्वराशी एकरूप होतो. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, जो समोर दिसणाऱ्या आकर्षक गोष्टी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी निरर्थक आहेत हे जाणून त्यांचा आकर्षणाला बळी न पडता सततच्या अभ्यासाने परमपुरुषाचे ध्यान करतो तो त्याला जाऊन मिळतो.

Advertisement

अभ्यासी चित्त जोडूनि योगी अन्य न लक्षुनी । पुरुषास महा दिव्य पावे संतत चिंतुनी ।। 8 ।। सर्व लोकांना भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टी झटपट घडाव्यात आणि आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याचा लगेच अनुभव मिळावा असे वाटते पण त्यासाठी परिश्रम करण्याची त्यांची तयारी नसते. साधं शाळा कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्याला माणसाला सोळा वर्षे लागतात तरी नोकरी मिळण्याची खात्री नसते मग इथे जन्माचे भले होऊन जन्म-मृत्यूची येरझार चुकवायची आहे मग त्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावा लागणार आणि परिश्रमही करावे लागणार.

लोकांचे झटपट यश पदरात पडण्याचे मनोगत जाणून असलेले माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, जो मन आणि बुद्धि ईश्वराच्या चरणी अर्पण करेल तो त्याच्याशी एकरूप होईल असे भगवंतांनी सांगितले आहे पण अशी स्थिती कशी होईल असा जर संशय मनात येत असेल तर अगोदर त्यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास करायला हवा. विषयातील मन काढून घेऊन त्याला ईश्वरस्मरण करायला लावणे सहजी शक्य होत नाही. त्यासाठी निश्चयाने सुरवात करायला हवी. सुरवातीला ते नामस्मरणात स्थिर न झाल्याने इकडेतिकडे भटकू लागेल. त्याला तेथून काढून पुन्हा नामस्मरणाला लावायला हवे. हे सगळे अभ्यास ह्या सदरात येते.

Advertisement
Tags :

.