रद्द होण्यापेक्षा कलबुर्गी रेल्वे सांगलीपर्यंत आणा
सांगली :
रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे आणि कलबुर्गी एक्स्प्रेस सांगलीला न पाठवण्याच्या हट्टामुळे कोल्हापूर कलबुर्गी रेल्वे गाडीला घरघर लागली आहे. ही गाडी रद्द करण्याचा काही अधिकाऱ्यांचा इरादा असून त्याऐवजी ही गाडी सांगलीपर्यंत आणण्यात यावी आणि सांगलीचा एक डबा अधिकचा जोडण्यात यावा, अशी प्रवासी संघटनांची मागणी आहे. मात्र त्याबाबत दिशाभूल करून प्रवाशांमध्ये सांगली, कोल्हापूर असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
या गाडीचा इतिहासच मोठा रंजक आहे. २०११ साली मिरज मार्गे कोल्हापूर सोलापूर ही पहिली रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. कोल्हापूर आणि सोलापूरला जोडताना सांगलीला स्थानकालाही प्रारंभीच या स्थानकाने जोडले असते तर पंढरपूर, सोलापूर या मार्गावर सांगलीकरांना एक जादाची गाडी झाली असती. शिवाय कोल्हापूरला जाण्यासाठीही एक अधिक गाडी मिळाली असती. या गाडीने अवघ्या १२० रूपयांमध्ये सोलापूरपर्यंतचा प्रवास होणार असल्यामुळे त्याला सांगलीतून भरघोस प्रतिसाद मिळाला असता.
प्रवासी संघटनेचे उमेश शहा यांच्या म्हणण्यानुसार या गाडीची पाचशे तिकीटे सांगलीत हातोहात खपली असती. इतके सांगली शहरासह जिल्हयातील लोकांचे या मार्गावरील प्रवासाला प्राधान्य आहे. सांगलीतून मिरजेला जाऊन ही गाडी पकडण्यासाठी त्यांना रेल्वे तिकीटापेक्षाही अधिक खर्च येणार असल्याने या गाडीचा गवगवा सांगलीपर्यंत झालाच नाही.
वास्तविक रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगली असो की कोल्हापूर सर्वच स्थानकावरून प्रवाशी वाहतूक वाढण्याला प्राधान्य असले पाहिजे, ज्यामुळे ही गाडी फायद्यात गेली असती मात्र तसे झाले नाही परिणामी कोल्हापूर सोलापूर गाडी थेट बंद करण्यात आली. ही नामुष्कीजनक घटना होती. कोल्हापूरचे असलेले प्रवासी आणि सांगलीचे वंचित राहणाऱ्या सर्वांवरच अन्याय झाला. सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री असताना मिरजमार्गे सांगली सोलापूर अशी गाडी सुरू करण्याची मागणी इथल्या प्रवाशांनी केली. पण, मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सांगली सोलापूर एक्सप्रेस ऐवजी हट्टाने मिरज सोलापूर अशीच गाडी सुरू केली. परत ही गाडी सांगली स्टेशनवर येणार नसल्याने सांगलीतील प्रवाशांनी मिरज गाठून या गाडीतून प्रवास करणे टाळले. रेल्वे बोर्डाने ही गाडीही तोट्यात असल्याचे कारण देऊन कायमची बंद केली. ही गाडी रद्द करण्यापेक्षा ती सुरू ठेवायची, त्याला सांगलीसाठी अधिकचा एक डबा वाढवायचा असा सांगलीकर प्रवाशांचा प्रस्ताव आहे. सांगलीतील प्रवाशांना सोलापूर आणि कलबुर्गीपर्यंतचा प्रवास सोईचा आहे. इथल्या प्रवाशांकडून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. केवळ काही लोकांच्या हट्टासाठी सांगलीच्या प्रवाशांना वंचित ठेवायचे आणि गाडी रद्द करायची असा प्रकार करण्यापेक्षा हा प्रयोग करण्याची मागणी होत आहे. दरम्यान या बाबत कोल्हापुरातील प्रवासी मात्र शंका उपस्थित करत आहेत की, सांगलीला गाडी गेली तर ती कोल्हापुरातून न जाता सांगलीतून मिरजेमार्गे जाईल आणि ती सांगली कलबुर्गी अशीच होईल, कोल्हापूरला डावलले जाईल. वास्तविक असा कोणताच प्रस्ताव नाही आणि सांगलीला गाडी आली नाही तर तोट्यात असल्याने कोल्हापूर कलबुर्गी गाडीचे आधीच्या गाडीप्रमाणेच होणार हे निश्चित आहे. सांगली, कोल्हापूर वाद न घालता प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन राबवावे, अशी मागणी होत आहे.
- कोल्हापूर, सोलापूर, कलबुर्गी मार्गही फसला
पहिले तीन प्रयोग अपयशी ठरले असतानाही सांगली स्थानकाला वगळून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न सुरूच राहिला. कोल्हापूर जिल्ह्यातील काही संघटनांनी प्रस्ताव देऊन पुर्वीची कोल्हापूर सोलापूर गाडी कलबुर्गीपर्यंत विस्तार करावी आणि या मार्गावर मोठा प्रवासी वर्ग मिळेल असा प्रस्ताव दिला. हा पर्याय मध्यरेल्वेने मान्य केला. पण, गेली दोन वर्षे झाली तरीही या गाडीला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत.
- कलबुर्गी गाडीची ५०० तिकीटे रोज शिल्लक
उपलब्ध माहितीनुसार कलबुर्गी गाडीची रोज किमान ५०० तिकीटे शिल्लक राहतात. गाडीला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. असेच सुरू राहिले तर कलबुर्गी गाडी सुध्दा मिरज सोलापूर, कोल्हापूर सोलापूर या गाडीप्रमाणे रद्द केली जाऊ शकते.