For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईराज, के आर शेट्टी, भाटे वॉरियर्स संघाचे शानदार विजय

10:13 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
साईराज  के आर शेट्टी  भाटे वॉरियर्स संघाचे शानदार विजय
Advertisement

सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा : अमेय भातकांडेची तुफानी फटकेबाजी, संतोष, अमेय, नरेंद्र  सामनावीर

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत  आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात साईराज वॉरियर्स, के. आर शेट्टी किंग्स व भाटे वॉरियर्स संघानी विजय मिळवला. जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिला सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने पोतदार रॉयल्स सीसीआय संघाचा पाच गड्यांनी पराभव केला. पोतदार रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 163 धावा केल्या. त्यात अंगदराज हितलमनीने 7 चौकारांसह 58, अभिषेक देसाईने 30, अमित यादव व रविचंद्र उखळी यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या. साईराज तर्फे शुभम भादवण्णकरने 2 गडी बाद केले. प्रत्यु त्तरादाखल खेळताना साईराज वॉरिअर संघाने 18.1 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा जमवत हा सामना 5 गड्याने जिंकला. त्यात केदारनाथ उसूलकरने 5 चौकार व एक षटकारांसह 40, झीशान अली सय्यदने 38, संतोष सुळगे-पाटीलने 13 चेंडूत 7 चौकारांसह 33, आदर्श माळीने 3 चौकार व एक षटकारांसह 27 धावा केल्या. पातेदार रॉयल्स तर्फे आकाश असलकरने 2 गडी बाद केले. सामनावीर संतोष सुळगे पाटील व इम्पॅक्ट खेळाडू केदारनाथ उसूलकर  प्रमुख पाहुणे गजानन फगरे अशोक  पाटील अनिल शिंदोळकर यांच्या हस्ते चषक देऊन करण्यात आला

दुसऱ्या सामन्यात के.आर. शेट्टी किंग्स संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा 54 धावाने पराभव केला. के आर शेट्टी किंग्स संघाने  प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 191 धावा केल्या. त्यात नरेंद्र मांगोरने 3 षटकार 3 चौकारांसह 46, गुरुप्रसाद पोतदारने 3 चौकार 3 षटकार 42, स्वप्निल येळवेने 6 चौकारांसह 30, हबीब ताडपत्री 3 षटकार एक चौकारांसह 31, राजेंद्र दंगणावर 19 धावा केल्या. इंडियन बॉईज तर्फे मानवी व सुमित करगावकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा डाव 17.1 षटकात 127  धावात आटोपला.त्यात तनिष्क नाईकने 5 चौकारांसह 28, कवीश मूकण्णवरने 24, सुशांत कोवाडकरने 19 धावा केल्या. साईराज वॉरियर्स तर्फे किरण तारळेकर व नासिर पठाण यांनी प्रत्येकी 3 तर राजेंद्र दंगनावरने 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश पाटील व सुनील जीनराळकर यांच्या हस्ते सामनावीर नरेंद्र मांगोरे व इम्पॅक्ट खेळाडू राजेंद्र दंगणावर यांना चषक देऊन गौरविण्यात आले

Advertisement

तिसऱ्या सामन्यात उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत भाटे वॉरियर्स संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाचा केवळ एक गडी राखून पराभव करत या स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले.  सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडीबाद 169 धावा केल्या. त्यात शिवप्रकाश हिरेमठने 8 चौकार 2 षटकारांसह 80, पार्थ पाटीलने 7 चौकार व 2 षटकारांसह 70 धावा केल्या. भाटे वॉरिअर्स तर्फे रोहित पाटीलने 4 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमेय भातकांडेच्या घनाघाती फलंदाजीच्या जोरावर भाटे वॉरियर्स संघाने  19.5 षटकात 9 गडी बाद 170 धावा करून सामना जिंकला. त्यात अमेय भातकांडेने केवळ 38 चेंडूत 8 षटकार 3 चौकारांसह 79 धावांची शानदार खेळी केली. त्याला वैष्णव संगमित्राने 32, तर माजीद मकानदारने 21 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना तर्फे पार्थ पाटील व केतज कोल्हापुरे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामनावीर अमेय भातकांडे, इम्पॅक्ट खेळाडू पार्थ पाटील याना प्रमुख पाहुणे रोहन चव्हाण व मनोहर भांडगे यांच्या हस्ते चषक देऊन करण्यात आले.

अमेयची तुफानी फटकेबाजी

रविवारच्या तिसऱ्या सामन्यात भाटे वॉरियर्स संघाच्या अमेय भातकांडेने आक्रमक खेळी करीत सामना विजय मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला.

Advertisement
Tags :

.