ब्रिजेश, सागर, सुमित यांची पदके निश्चित
वृत्तसंस्था/ अॅस्ताना (कझाकस्तान)
येथे सुरू असलेल्या 22 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई युवा मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या ब्रिजेश तमटा, सागर जाखर आणि सुमित यांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरी गाठत आपली पदके निश्चित केली आहेत.
48 किलो वजन गटात ब्रिजेशने उझबेकच्या सॅबीरोव्ह सैफुद्दीनचा 4-3 अशा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 60 किलो वजन गटात सागर जाखरने थायलंडच्या टी. कलासिरेमचा 5-0 तसेच 67 किलो वजन गटात भारताच्या सुमितने कोरियाच्या हाँग जिनचा 5-0 अशा गुण फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. मात्र 54 किलो वजन गटात भारताच्या जितेशला कझाकस्तानच्या नुरासिलकडून हार पत्करावी लागली. नुरासिलने ही लढत 5-0 अशी एकतर्फी जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. पुरूष विभागात आता भारताची तीन पदके निश्चित झाली आहेत.
तर या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या पाच स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत एकूण भारताची आठ पदके निश्चित झाली आहेत. महिलांच्या विभागात 48 किलो गटात अनुने, 66 किलो गटात पार्थवी ग्रेवालने, 60 किलो गटात निकिता चांदने, 81 किलो गटात खुशी पुनियाने आणि 81 किलोवरील गटात निरजहरा बानाने शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले आहे. तसेच पुरूषांच्या विभागात 75 किलो गटात भारताचे राहुल कुंडू, 86 किलो गटात हेमंत सांगवान, 92 किलोवरील गटात लक्ष्य राठी, महिलांच्या विभागात 50 किलो गटात लक्ष्मी, 54 किलो गटात तमन्ना, 57 किलो गटात यात्री पटेल आणि 63 किलो गटात सृष्टी साठे यांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती उशिरा होत आहेत. महिलांच्या विभागात 54 किलो गटात आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रितीने यापूर्वीच पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट निश्चित केले आहे. तिचा सामना उझ्बेकच्या निगीनाशी होणार आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनने 50 सदस्यांचा संघ पाठविला आहे. सदर स्पर्धेमध्ये 24 देशांची सुमारे 400 स्पर्धक विविध 25 वजन गटांमध्ये पदकांसाठी लढत देतील. या स्पर्धेतील युवा आणि 22 वर्षाखालील अशा दोन गटातील अंतिम सामने 6 आणि 7 मे रोजी होतील.