दोन गुणांनी नोकरीची संधी हुकल्याने घेतला टोकाचा निर्णय; अत्यंत हुशार तरुणीने आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ
वाकरे: भामटे (ता. करवीर) येथील वैष्णवी रामचंद्र पाटील (वय २३) या युवतीने रेल्वे विभागाच्या स्पर्धा परीक्षेत अवघ्या दोन मार्कांनी अपयश आल्याने आलेल्या नैराश्यातून जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सोमवार, दि. २१ रोजी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. एका होतकरू तरुणीने अशा प्रकारे मृत्यूला कवटाळल्याने भामटे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीने बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. तिचे वडील शेती करतात, तर आई घरकाम करते. घरची परिस्थिती सामान्य असली तरी वैष्णवीला सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी जिद्द होती. गेल्या दोन वर्षांपासून ती स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास करत होती. या काळात तिने विविध परीक्षा दिल्या होत्या, मात्र तिला अपेक्षित यश मिळत नव्हते.
सहा महिन्यांपूर्वी तिने रेल्वे विभागातील एक परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये वैष्णवीला अवघ्या दोन ते तीन मार्कानी पुन्हा अपयश आले. हातातोंडाशी आलेला नोकरीचा घास थोडक्यात हिरावला गेल्याने ती प्रचंड निराश झाली होती. याच अपयशामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ती नैराश्यात गेली होती, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.
सोमवारी रात्री ९ च्या सुमारास वैष्णवीचे वडील रामचंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे जनावरांच्या गोठ्यात जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना वैष्णवीने गोठ्यात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईकांनी धाव घेत तिला खाली उत्तरवले आणि बेशुद्धावस्थेत तातडीने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अंमलदार शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. घटनेची नोंद पोलिसांत झाली. पुढील तपास सुरू आहे.
अत्यंत हुशार तरुणी
वैष्णवी पाटील हिने स. ब. खाडे महाविद्यालयातून बी. कॉम. चे शिक्षण घेतले होते. महाविद्यालयीन जीवनात अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते. मात्र अत्यंत हुशार असणाऱ्या या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला आहे.