राजापूर तलाठ्याविरोधात लाचेचा गुन्हा
तासगाव :
शेतजिमिनीची नोंद सातबारा सदरी करण्यासाठी राजापूर (ता.तासगांव) येथील तलाठयाने सर्कलच्या नावाने स्वत:करीता दोन हजारांची लाच मागितली. याप्रकरणी त्यांच्या विरोधात तासगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजापूर येथील एकाने तक्रार दिली आहे. तलाठी सुजाता आण्णाप्पा जाधव (रा.वारणा प्रेस्टिज अपार्टमेंट प्लॅट नं.4 वारणाली गल्ली नं.4, सांगली) यांच्या विरूध्द लाच मागितले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजापूर येथील एकाने जमीन खरेदी केली होती. त्याची सातबारा सदरी नोंद करण्यासाठी तलाठी जाधव यांनी तासगांव तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या बाहेर सुरूवातीला सर्कल यांच्या नावाने तीन हजार रूपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी संबधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि.11 फेब्रुवारी रोजी लाच मागणीची खातरजमा केली. तडजोडीअंती सर्कल यांचे नावाने तक्रारदार यांचेकडे दोन हजार लाचेची मागणी केली. याप्रकरणी तलाठी सुजाता जाधव यांच्या विरोधात लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.