झारखंडमध्ये सत्तांतराची परंपरा मोडीत
सलग दुसऱ्यांदा येणार सोरेन सरकार
भाजपने झारखंड विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. परंतु निकाल पाहता भाजपला मोठा झटका बसला आहे. याचबरोबर झारखंड निवडणुकीत एक परंपरा मोडली गेली असून राज्यात प्रथमच एक पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आला आहे. राज्यात झामुमोला 33 जागांवर यश मिळाले आहे. झामुमोने मागील वेळेच्या तुलनेत 3 जागा अधिक पदरात पाडून घेतल्या आहेत. तर झामुमोचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसने 16 जागा जिंकल्या आहेत. राजदला 5 तर माकप मालेला 2 जागा जिंकता आल्या आहेत. तर भाजपला राज्यात 22 जागांवरच यश मिळू शकले आहे. रालोआतील घटक पक्ष संजदने एका जागेवर विजय मिळविला आहे.
झामुमोने आता सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. निवडून आलेल्या आमदारांना पक्षाने रांची येथे येण्याचा निर्देश दिला आहे. झामुमोच्या विधिमंडळ गटाची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. हेमंत सोरेन यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा इंडिया आघाडीच्या संयुक्त बैठकीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
काँग्रेस नेत्यांनी घेतली सोरेन यांची भेट
झारखंडमध्ये बहुमत मिळाल्यावर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली आहे. याआधीही आमचे सरकार संकटात असताना आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने सरकार स्थापन करू असे सांगितले हेते. आम्ही पुन्हा एकदा पूर्ण विश्वासाने सरकार स्थापन करणार आहोत असे काँग्रेस नेते राजेश ठाकूर यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारने चांगले काम केले आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी विशेषकरून महिलांसाठी काम केले, असे उद्गार काँग्रेसचे निरीक्षक तारिक अन्वर यांनी काढले आहेत.
मुख्यमंत्रिपदाचे दावेदार पराभूत
बोकारो जिल्ह्यातील चंदनकियारी मतदारसंघात भाजप नेते अमर बाउरी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बाउरी हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. भाजप सत्तेवर आला असता तर बाउरी हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरले असते. ओडिशाचे राज्यपाल आणि माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या सून पूर्णिमा दास यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघात विजय मिळविला आहे. काँग्रेसचे अजय कुमार यांना त्यांनी पराभूत केले आहे.
राजकीय अस्थिरतेची पार्श्वभूमी
81 सदस्यीय विधानसभा असलेले झारखंड हे राज्य राजकीय दृष्ट्या खूपच अस्थिर राहिले आहे. या राज्यात अपक्ष म्हणून निवडून आलेले मधु कोडा हे मुख्यमंत्री झाले होते. अशा स्थितीत राज्यातील राजकीय स्थितीचा अंदाज बांधता येतो. 2000 साली बिहारपासून वेगळा होत झारखंड राज्य अस्तित्वात आल्यापासून भाजपचे रघुवर दास हेच केवळ स्वत:चा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले होते. परंतु पुढील निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. म्हणजेच कुठलेच सरकार झारखंडमध्ये पुन्हा सत्तेवर येऊ शकले नव्हते.
सोरेन यांच्याबद्दल सहानुभूती
अशास्थितीत यंदाच्या निवडणुकीत झामुमोच्या विजयामागे राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात डांबणे घटक ठरल्याचे मानले जात आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्यावरून एक सहानुभूतीची लाट पूर्ण आदिवासीबहुल भागांमध्ये होती. राज्यातील भाजपच्या पराभवामागे हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईला महत्त्वपूर्ण घटक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. भाजपने या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला नव्हता. याचाही फटका भाजपला बसला आहे.
बरहेट मतदारसंघात हॅट्ट्रिक
हेमंत सोरेन यांनी स्वत:चा पारंपरिक मतदारसंघ बरहेटमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. भाजपचे उमेदवार गमालियल हेंब्रम यांना त्यांनी पराभूत केले आहे. बरहेट मतदारसंघात सोरेन यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
सरायकेलामध्ये चंपई सोरेन विजयी
झामुमो सोडून भाजपमध्ये सामील झालेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघात विजय मिळविला आहे. या मतदारसंघात ते 18624 च्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. तर डुमरी मतदासंघात झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे उमेदवार जयराम महतो हे निवडून आले आहेत.
गांडेयमध्ये कल्पना सोरेन यांची सरशी
झारखंडमधील गांडेय मतदारसंघात हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी मुनिया देवी यांना पराभूत केले आहे. गांडेय येथे कल्पना सोरेन आणि मुनिया देवी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत दिसून आली आहे. कल्पना सोरेन यांना आता राज्य सरकारमध्ये मोठे पद दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
जामताडामध्ये इरफान अंसारींचे वर्चस्व
जामताडा मतदारसंघात काँग्रेसचे इरफान अंसारी यांनी विजय मिळविला आहे. या मतदारसंघात अंसारी यांनी भाजपच्या उमेदवार सीता सोरेन यांना पराभूत केले आहे. सीता सोरेन यांच्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावाच्या पत्नी आहेत.
रांची मतदारसंघात भाजपला यश
राज्याची राजधानी असलेल्या रांची मतदारसंघात भाजप उमेदवार चंद्रेश्वर यांनी झामुमोच्या उमेदवार महुआ माजी यांना पराभूत केले आहे. रांची येथे विजय मिळविता आल्याने भाजपला काही प्रमाणात दिलासा मिळू शकला आहे. झारखंडची स्थापना झाल्यापासून म्हणजेच 2005 च्या निवडणुकीपासून भाजपचे मातब्बर नेते चंद्रेश्वर प्रसाद सिंह या मतदारसंघात विजयी होत आले आहेत.
माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा पराभव
माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. जगन्नाथपूर येथे त्या भाजपच्या उमेदवार होत्या. काँग्रेसचे सोनाराम सिंकू यांनी त्यांचा पराभव केला आहे.
झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून तेथे झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता राखली आहे. राज्यात दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले होते. झारखंडमध्ये विजय मिळाल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात झामुमोने 31 जागांवर तर आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस 12, राजद 6 आणि डाव्या पक्षांना 2 जागांवर यश मिळाले आहे.
तर भाजपने जंगजंग पछाडूनही पक्षाला राज्याची सत्ता मिळविता आलेली नाही. एकीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआची पूर्ण प्रचारमोहीम ‘घुसखोरी’ रोखण्यावर केंद्रीत होती, तर दुसरीकडे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विविध कल्याणकारी योजना राबवून तसेच आदिवासी मतदारांवरील पकड कायम ठेवत राज्यातील सत्ता राखली आहे.
सोरेन यांचे मोठे निर्णय, जनतेला पसंत
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अनेक निर्णय घेतले, जे थेट स्वरुपात त्यांच्या हक्काच्या मतपेढीला डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आले होते. 1932 च्या खतियान आधारित स्थानिक धोरणाचे विधेयक, मॉब लिंचिंग प्रतिबंधकाशी संबंधित विधेयक, खासगी क्षेत्रातील नियुक्तीत राज्याच्या लोकांसाठी आरक्षण, आदिवासी आणि दलितांसाठी वयाच्या 50 वर्षांपासून वृद्धावस्था पेन्शनची योजना, राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे निर्णय याचे उदाहरण आहे.
स्थानिकतेचे धोरण
झारखंडमध्ये स्थानिकतेच्या धोरणावरील भाजपच्या भूमिकेविषयी लोकांमध्ये नाराजी राहिली आहे. यापूर्वी रघुवर दास सरकारदरम्यान ज्याप्रकारे स्थानिकतेच्या धोरणात बदल केला होता, ते पाहता तेथील सर्वसामान्य मतदार विशेषकरून आदिवासी समाजाने योग्य मानले नव्हते. याचमुळे 2019 च्या विधानसभा निवडणूक आणि आता 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्येही मतदारांनी झामुमो आणि हेमंत सोरेन यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
भावनात्मक जवळीक
भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये झामुमो प्रमुख हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबणे झारखंडच्या मतदारांच्या पचनी पडलेले नाही. स्थानिक आदिवासी समुदायाने याला भावनात्मक स्वरुपात घेत हेमंत सोरेन यांच्या बाजूने एकजूट होत मतदान केल्याचे मानले जात आहे.
बाहेरील नेत्यांमुळे भाजपला फटका
झारखंडमध्ये भाजपच्या पूर्ण प्रचार मोहिमेत स्थानिक नेत्यांऐवजी बाहेरील नेत्यांना प्राधान्य देण्यात आले होते. याविषयी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्रचारमोहिमेदरम्यान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्यासारखे बाहेरील नेते उघडपणे मैदानात दिसून आले. तर स्थानिक भाजप नेत्यांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. बाहेरील नेत्यांच्या आवाहनाशी लोक भावनात्मक स्वरुपात जोडले गेले नाहीत.
मइयां सन्मान योजना
मुख्यमंत्री मइयां सन्मान योजना हेमंत सोरेन सरकारसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेच्या अंतर्गत 19-50 वयोगटातील महिलांना झारखंड सरकारकडून दर महिन्याला एक हजार रुपये दिले जातात. छोट्या छोट्या गरजांसाठी घरातील पुरुषांवर अवलंबून असलेल्या गरीब महिलांवर या योजनेचा सर्वाधिक प्रभाव पडला आहे. सोरेन सरकारच्या या योजनेनंतर भाजपने देखील गोगो दीदी योजनेची घोषणा केली होती. तर प्रत्युत्तरादाखल झामुमो आमदार कल्पना सोरेन यांनी पुन्हा सत्तेवर आल्यास मइयां योजनेच्या अंतर्गत प्रदान केली जाणारी रक्कम 2500 रुपये करण्याची घोषणा केली होती. राज्यात सुमारे 50 टक्के महिला मतदार आहेत. तर राज्यातील 32 जागांवर महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे. महिला मतदारांनी झामुमोच्या बाजूने मतदान केल्याचे चित्र सध्यातरी समोर आहे. मइयां योजनेच्या अंतर्गत राज्यातील 51 लाखाहून अधिक महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे.
आदिवासीबहुल मतदारसंघांमध्ये वर्चस्व
आदिवासी समुदाय हा झामुमोची हक्काची मतपेढी असल्याचे मानले जाते. झारखंडमध्ये आदिवासींचे प्रमाण 26 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अनेक मतदारसंघांमध्ये आदिवासींचे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. राज्यातील आदिवासी मतदारांनी पुन्हा एकदा हेमंत सोरेन यांच्यावर विश्वास दाखविला असल्याचे निकालातून स्पष्ट होते. तर भाजपकडे हेमंत सोरेन यांच्या तोडीचा कुठलाच मोठा आदिवासी नेता नाही. हेमंत सोरेन यांच्या भावाच्या पत्नी सीता सोरेन आणि चंपई सोरेन भले झामुमो सोडून भाजपमध्ये आले असले तरीही आदिवासींना हे पक्षांत आवडले नसल्याचे मानले जात आहे. आदिवासींचे प्रमाण अधिक असलेल्या जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये झामुमो अन् काँग्रेसने यश मिळविले आहे.
मुस्लीम-यादवबहुल मतदारसंघ
आदिवासींसोबत झारखंडमध्ये मुस्लीम आणि यादवबहुल मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीला यश मिळाले आहे. झारखंडमध्ये 10 मतदारसंघांमध्ये मुस्लीम अन् यादव समुदायाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी झारखंडमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला होता. परंतु राज्यात ध्रूवीकरण होऊ शकले नाही. येथे ‘हिंदू-मुस्लीम’पेक्षा अधिक आदिवासी अस्मितेचे खेळी यशस्वी ठरली आहे. भाजपने बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता, परंतु हेमंत सोरेन यांनी भाजपवर ‘काटो-बांटो’चे राजकारण करण्याचा आरोप करत ‘बेटी-माटी-रोटी’चा नारा दिला, जो यशस्वी ठरला आहे.
सोरेन यांचा तुरुंगवास भाजपसाठी बॅकफायर
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 31 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचा 8.86 एकर भूखंड अवैध स्वरुपात प्राप्त केल्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. सोरेन यांनी स्वत:वर झालेल्या कारवाईला आदिवासी अस्मितेशी जोडले होते. गरीबांचा नेता हेमंत सोरेन यांना भाजपने कट रचून तुरुंगात डांबल्याचा प्रचार झामुमोने केला होता. आपण कुठलाच घोटाळा केलेला नाही. भाजपने सूडाच्या राजकारणातून कारवाई करविल्याचे जनतेला पटवून देण्यास सोरेन यांना यश मिळाले आहे.
कल्पना सोरेन यांची साथ
हेमंत सोरेन हे तुरुंगात असताना त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी तळागाळात जात पक्ष एकजूट केला होता. त्यांनी प्रत्येक ठिकाणी हेमंत सोरेन यांचा तुरुंगवास हा जनतेच्या नेत्यासोबतचा अन्याय असल्याचे म्हटले होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी जोरदार प्रचार केला होता. गावोगावी जाणाऱ्या कल्पना सोरेन यांच्याशी मतदार जोडले जात होते.
हेमंत विश्व शर्मांचे निवडणूक व्यवस्थापन अपयशी
झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळविता आले नाही. राज्यात भाजपसाठी जोरदार प्रचार करणारे आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या राज्यातील प्रभावावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने हेमंत यांना तेथील जबाबदारी सोपविली होती. झारखंडमध्ये अपेक्षित कामगिरी करता न आल्याने हेमंत यांच्या नेतृत्व कौशल्यावर आता प्रश्न उपस्थित होणार आहेत.