संसारचक्र भेदणे माणसाच्या कुवतीच्या बाहेरचं आहे
अध्याय पाचवा
राजानं बाप्पांचा उपदेश अत्यंत आदराने ऐकला पण मनाच्या चंचल आणि दुष्ट प्रवृत्तीमुळे तो अंमलात आणायला अवघड आहे असे त्याला वाटू लागले. त्यावर बाप्पांनी त्याला सांगितले की, मनाच्या सगळ्या उड्या आपण कर्ते आहोत या गैरसमजावर आधारित असतात आणि तो समज इतका दृढ असतो की, अनिष्ट गोष्टीसुद्धा करायला तो मनाला उद्युक्त करतो. तेव्हा सर्वप्रथम मी कर्ता नाही व ईश्वर कर्ता आहे हा समज मनात दृढ करावा. त्यामुळे ईश्वर कर्ता असल्याने जे जसजसं होईल तसतसं घडू देण्यातच आपलं भलं आहे हा समज मनात दृढ होऊन मन हळूहळू स्थिर होऊ लागेल. हे संसारचक्र विविध विषय व कर्म यांनी व्यापलेलं आहे असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
विषयैऽ क्रकचैरेतत्संसृष्टं चक्रकं दृढम् । जनश्छेत्तुं न शक्नोति कर्मकीलऽ सुसंवृतम् ।। 21 ।।
अर्थ-विषयरूपी आऱ्यांनी तयार केलेले व कर्मरूपी खिळ्यांनी घट्ट बसविलेले हे दृढ चक्र छेदण्यास मनुष्य समर्थ नाही.
विवरण- मनाच्या चंचलतेला आळा घालण्याबद्दल बाप्पा सांगतायत. अभ्यास आणि वैराग्य हे दोन उपाय त्यांनी मागील श्लोकात सांगितले. मनात येणारे विचार माणसाचं मन भरकटू देत असतात. हे मनाचं भरकटणं थांबवण्याचा उपाय श्रीगोंदवलेकर महाराज असा सांगतात की, मनात एखादा विचार आला की, मन त्याला इतर विचारांची जोड देत असतं. त्याला फाटे फोडणं असंही म्हणता येईल. उदाहरणार्थ तुम्ही गावाला जायचा विचार करताय तर स्टँडवर जाऊन त्या गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसलं की झालं. पण घरीच बसून बस मिळेल का, वेळेत पोहोचेल का, अपघात तर होणार नाहीना? असे एक ना अनेक विचार मनात थैमान घालत असतात. मनात अनेक संकल्पविकल्प येत असतात. त्यानुसार मनात विचार येतात. म्हणून श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ठीक आहे, येऊद्यात मनात विचार पण त्याला फाटे फोडू नका. म्हणजे मन बऱ्यापैकी स्थिर राहील. तसेच वैराग्याबद्दल सांगताना बाप्पा म्हणतात, जे मिळतंय त्यात समाधानी रहा. अर्थात हे दोन्ही उपाय करणं कठिणतम आहे याची बाप्पांना कल्पना आहे. म्हणून या श्लोकात ते म्हणताहेत, हे संसार चक्र भेदायला फार कठीण किंवा अशक्य आहे. एखाद्या चक्राची मजबुती त्याला बसवलेल्या अऱ्यावर अवलंबून असते. हे आरे जितके ताकदवान असतात त्याप्रमाणात ते चक्र टिकाऊ आणि सशक्त होत जाते. संसारचक्राचे विषयरुपी आरे तर फारच ताकदवान असतात. माणसाला विषय फार प्रिय असतात. त्यांचा त्याग करावा असा विचार करून तो पुढे निघाला की, षड्रिपु त्याची वाट अडवून त्याला नामोहरम करतात. बरं एकदा विषयाचा उपभोग घेतला की संपलं असं कधीच होत नाही कारण विषय बघितला की, माणसाला त्याचा मोह होतो. पुढे उपभोगून झाला की, आणखी हवा असा लोभ सुटतो. ज्याला आपल्या आधी उपभोगायला मिळालाय त्याचा मत्सर वाटू लागतो, जो विषयोपभोग मिळण्याच्या आड येईल त्याचा राग येतो. असे सर्वबाजुनी षड्रिपु मनुष्याला घेरून टाकतात. वास्तविक पाहता षड्रिपु माणसाला ईश्वरानेच दिलेले आहेत पण मनुष्य त्यांचा योग्य ठिकाणी, योग्य मात्रेत उपयोग न करता अतिरेक करतो. अर्थात हे सर्व मी कर्ता आहे या भावनेतून होतं. म्हणून मनुष्याने सदैव ईश्वर स्मरणात रहावं म्हणजे षड्रिपु आटोक्यात राहतील व मनाच्या चंचलतेला आळा बसेल.
संसारचक्र घट्ट रहावं म्हणून विषयांचे आरे आणि कर्माचे खिळे ठोकलेले आहेत. विषयानुरूप इच्छा माणसाला होतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू होते. या संसार चक्राचे विषयांचे आरे आणि कर्माचे खिळे मनुष्याला जीवनभर गुंतवून ठेवतात. एक झालं की दुसरं अशी कर्मांची मालिका त्याच्या मागं लागते आणि त्यातच तो गुंतून पडतो.
क्रमश: