For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Breaking 'पाऊस आहे सावकाश जा' भावाच्या घरुन परतलेल्या बहिणीने घेतला कायमचा निरोप, ट्रकच्या धडकेत ४ जण ठार, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश

06:57 PM Jun 04, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
breaking  पाऊस आहे सावकाश जा  भावाच्या घरुन परतलेल्या बहिणीने घेतला कायमचा निरोप  ट्रकच्या धडकेत ४ जण ठार  मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश
Advertisement

उत्तूर : प्रतिनिधी 'पाऊस आहे, सावकाश या...' असा आपुलकीचा निरोप बहिणीला देऊन अवघी पाच मिनिटे झाली असतील, तोच संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याची दुर्दैवी घटना घडली. निपाणी-उत्तूर मार्गावरील मुमेवाडी घाटात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात होन्याळी (ता. आजरा) येथील चांदे कुटुंबातील आई-वडिलांसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने आजरा, माद्याळ, उत्तूर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

या अपघातात दिपक दत्तात्रय चांदे (वय ४५), पत्नी शोभा चांदे (वय ३३), मुलगा जय (वय ९) आणि मुलगी पूर्वा (वय ६) यांचा मृत्यू झाला. एका क्षणात संसाराचा डोलारा कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चांदे कुटुंब दुचाकीवरून होन्याळीहून माद्याळकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. बहिरेवाडी परिसरातील पाऊस काहीसा ओसरल्यानंतर ते मुमेवाडी घाटातून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि ती सुमारे २०० मीटरपर्यंत फरफटत नेली. अखेर ट्रक रस्त्यालगतच्या गटारीत अडकून थांबला; मात्र तोपर्यंत संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला होता.

Advertisement

अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. धडकेच्या जोरात शोभा चांदे या दूर फेकल्या गेल्या. मुलगा जय ट्रकच्या चाकात अडकून पडला होता, तर चिमुकली पूर्वा चाकाजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळली. दिपक चांदे दुचाकीत अडकलेल्या अवस्थेत होते. दिपक, जय आणि पूर्वा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शोभा यांनी काही वेळाने अखेरचा श्वास घेतला.

या दुर्घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे चांदे कुटुंब शुक्रवारी मुंबईला परत जाणार होते. मुंबईतील साकी विहार, तुंगा-पवई परिसरात वास्तव्यास असलेले दिपक चांदे हे खाजगी इलेक्ट्रिक कंपनीत कार्यरत होते. सुटीनिमित्त गावी आलेल्या या कुटुंबाचा आनंदी प्रवास काही क्षणातच मृत्यूच्या प्रवासात बदलला.

अपघातापूर्वी अवघ्या पाच मिनिटे आधी माद्याळ येथील राजेंद्र गवळी यांच्या पत्नी संगीता यांनी नणंद शोभा यांना फोन करून, “पाऊस आहे, सावकाश या,” असा निरोप दिला होता. मात्र काही मिनिटांतच चौघांच्या मृत्यूची बातमी मिळताच गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक प्रेमचंद (रा. अमेठी, उत्तर प्रदेश) हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

निपाणी - उत्तूर मार्गावर गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसाने ट्रकचालकाचा अंदाज चुकल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस फरफटत नेल्याने होन्याळी ता . आजरा . आई वडीलांसह लेकरांचा जागीच मृत्यू झाला . मृतांमध्ये दिपक दत्तात्रय चांदे वय - ४५, शोभा दिपक चांदे वय - ३३, जय दिपक चांदे वय - ९ , पूर्वा दिपक चांदे वय - ६ यांचा मृतांमध्ये समावेश असून या घटनेची नोंद आजरा पोलिसांत झाली आहे .

अधिक माहिती अशी होन्याळी ता आजरा येथून दुचाकी क्रं - हिरो शाईन एम एच ०९ ई वाय ९७ ८३ ने माद्याळ ता . गडहिंग्लज कडे वडरगे मार्गे जाण्यासाठी निघाले होते . बहिरेवाडी परिसरात पाऊस कमी झाल्याने मुमेवाडी घाटातून वर जात असताना जयवंत महादेव चोथे यांच्या शेताजवळ समोरून निपाणीकडून - उत्तूर कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच १२ बाय ९४६५ हा चालक प्रेमचंद वय - २८ रा - अमेठी ( उत्तरप्रदेश ) याचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकीस फरफटत चोथे यांच्या शेताच्या गटारीकडे नेल्याने गटारीत दुचाकी खाली अडकली . निम्मी गटारीत कोंडली .

अपघाताची भीषणता इतकी होती की शोभा या दुचाकीवरून उडून जाऊन ट्रकच्या पुढील बाजूस पडल्या तर मुलगा जय हा ट्रकच्या समोरील डाव्या चाकात अडकून पडला . मुलगी पूर्वा ट्रकच्या चाकाजवळ तर दिपक हा दुचाकीत अडकून बसला . दिपक , पूर्वा , जय हे जागीच ठार झाले तर शोभा ट्रकच्या पुढे पडल्याने थोडावेळ जिवंत होत्या त्या ही नंतर मृत पावल्या .

रिमझिम पाऊस व अपघाताची भीषणता यामुळे वाहने कोणीही थांबवत नव्हते . उत्तूर येथील भाजी व्यापारी सुभाष पाटील हे बहिरेवाडी येथून उत्तूरला जात असताना अपघाताची भीषणता पाहून त्यांनी आजरा पोलिस ठाणे यांना फोनद्वारे माहिती दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी आले.

माद्याळ येथील ग्रामसेवकाचे वाहन

ग्रामस्थांनी शर्थीने चारही मृतदेहांना बाहेर काढल्यानंतर दुचाकीच्या नंबर प्लेटवरून गाडी माद्याळ येथील ग्रामसेवक राजेंद्र गवळी यांची असल्याचे स्पष्ट झाले मात्र मृतांमध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून दिपक चांदे असे नाव असल्याने सभ्रमावस्था निर्माण झाली . गवळी यांची बहीण भाऊजी व त्यांची मुले असल्याचे सांगून ते होन्याळी ता आजरा येथे राहाव्यास असतात असे सांगितले .

चांदे हे कायम मुंबई येथील साकी बिहार तुंगा पवई येथे राहत असून ते इलेक्ट्रिक कंपनीत कामाला आहे . होन्याळी येथे सुट्टी निमित्त गावी आले होते सुट्टी संपवून शुक्रवारी मुंबई येथे सहपरिवार जाणार होते मात्र काळाने घाला घातला.

चार ही मृतदेह आपटे फौंडेशनच्या रुग्णवाहिकेतून गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले . घटनेची माहिती मिळताच माद्याळ व गडहिंग्लज करांनी एकच गर्दी उपजिल्हा रुग्णालयात केली होती . दोन्ही गावांवर आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत होती . घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले , सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील , पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील , यांनी घटनास्थळाला भेट दिली . ठाणे अंमलदार जमीर मकानदार , सुधाकर हुले , सुदर्शन कांबळे आदी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला .

Advertisement
Tags :

.