पावसाची उघडीप ; शेतकऱ्यांची धांदल
सांगरूळ :
गेली पंधरा दिवस जोरदार झालेल्या पावसानंतर गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेती कामात व्यस्त झाला आहे. रब्बी पिकांची काढणी, मळणी आणि धान्य वाळवण्याची लगबग सर्वत्र दिसत आहे
मे महिन्याच्या उत्तरार्धात संततधार सुरू होती. या पावसामुळे मृग नक्षत्रापूर्वीच पावसाळा सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जवळजवळ 15 दिवसांनी सूर्यदर्शन झाले. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी रब्बी पिकाच्या काढणीत व्यस्त आहे. चिखल आणि पाण्यातून या पिकांची काढणी करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बऱ्याच ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या अगोदर व पावसातून मका, भुईमूग, भात, सूर्यफूल पिकांची काढणी केली आहे. या पिकांना वाढवण्यासाठी ऊन मिळाले नसल्याने धान्याला मोड येऊन नासाडी झाली आहे. ऊन पडल्यामुळे गल्लोगल्ली इमारतीच्या टेरेसवर जागा मिळेल, तिथे धान्य वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे.
काही ठिकाणी प्रत्येकाने दारात धान्य वाळत घातल्यामुळे गल्लीच्या गल्ली वाहतुकीसाठी बंद झाली आहे. एकाच वेळी सर्वांची कामे सुरू झाल्याने धान्य वाळवण्यासाठी आवश्यक बारदान आणि मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नैसर्गिक वाऱ्याची प्रतीक्षा न करता काही ठिकाणी फॅनचा वापर करून धान्याला वारे देण्याचे काम सुरू आहे.
पावसामुळे जनावरांच्या सुक्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसात भिजलेले भाताचे पिंजर मक्याचा कडबा, भुईमुगाच्या जाळ्या वाळवण्याबरोबरच वाळलेला चारा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पिकांना रासायनिक खते देण,s तणनाशक आणि कीटकनाशक फवारणीची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
- अखंड गल्ल्या पॅक
काढलेल्या पिकांचे धान्य वाळवण्यासाठी जागा नसल्याने गल्लीतच धान्य वाळत घातले आहे. त्यामुळे संपूर्ण गल्ल्याच्या गल्ल्या पॅक झाले आहेत.
- शेतीबरोबर इतर कामांचीही झुंबड
शेती बरोबरच घराच्या बांधकाम कामगारांची फॅब्रिकेशन व्यवसायिकांची गेली पंधरा दिवस बंद असलेली कामे पाऊस उघडल्याने एकाच वेळी सुरू झाली आहेत. यामुळे बांधकाम आणि फॅब्रिकेशन क्षेत्रातील कारागिरांचीही जोरदार लगबग सुरू आहे.