पावसाची उघडीप अन् शिवारात लगबग
कोल्हापूर :
जिल्ह्यात मोसमी पावसाची एन्ट्री झाली असली तरी गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी आणि पेरणीसाठी शिवारात बळीराजाची झुंबड उडाली आहे. तीन बंधारे अद्याप पाण्याखालीच असून पंचगंगेची पाणीपातळी 13.11 फुटांवर आहे. धरणक्षेत्रातही पावसाची दडी असल्यामुळे धरणांतील पाणीपातळी स्थिर आहे. शुक्रवारी दिवसभर काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती.
जिह्यामध्ये मे महिन्याच्या उत्तरार्धापासून धूळवाफ पेरणी केली जाते. पण यंदा 10 ते 11 मे पासून 30 मे पर्यंत झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे पेरण्यांचे काम पूर्णपणे खोळंबले. गेल्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शेतजमिनींना पूर्णपणे वाफसा आलेला नाही. परिणामी पेरणीपुर्व मशागतीच्या कामांमध्ये पुन्हा पुन्हा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अद्यापही पेरण्यांच्या कामांमध्ये गती आलेली नाही. कृषी विभागाच्या अंदाजानुसार केवळ 2 ते 3 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास पेरण्या लांबणीवर पडणार आहेत.
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशके योग्य दरामध्ये उपलब्ध होण्यासाठी उत्पादक, वितरक व विक्रेते यांच्या उत्पादन व विक्री स्थळांना अचानक भेटी देऊन तपासणी सुरु आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिह्यामध्ये सुमारे 2 लाख 5 हजार 368 हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी होणार आहे. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड आणि पन्हाळा तालुक्यामध्ये भात आणि नाचणीची मोठ्या प्रमाणात रोप लावण केली जाते. जुलै महिन्याच्या पुर्वार्धात रोप लावणीची कामे सुरु होतात. त्यासाठी भात आणि नाचणीचे तरवे टाकण्यासाठी पूर्वमशागतीचे काम जोरात सुरू आहे. तर इतर तालुक्यामध्ये पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पेरणीसाठी आणि पेरणीपूर्व मसागतीसाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटूंब शिवारात असल्याचे चित्र आहे.
- बियाणे पेरणीच्यावेळी घ्यावयाची काळजी
पेरणीपूर्व बियाण्यांस बुरशीनाशक व जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. पेरणीसाठी आणलेल्या बियाण्यांची पिशवी खालून फोडावी. व पिशवीवरील टॅग जपून ठेवावी. पेरणीपूर्व जमिनीची योग्य मशागत करून जीमन पेरणीयोग्य करावी. पेरणीनंतर पाऊस न आल्यास पाणी द्यावे. सोयाबीनसारख्या नाजून कवच असलेल्या बियाण्याची पेरणी करावी. बियाण्यांची पेरणी योग्य खोलीवर करावी. जमिनीत ओल नसणे, बियाणे जास्त खोल पडणे, पाणी साचलेल्या जमिनीत पेरणी, पेरणीनंतर पावसाचा खंड, योग्य निचरा न होणारी जमीन आदी कारणांमुळे बियाण्यांची उगवण कमी होऊ शकते.
- प्रमुख धरणांतील पाणीसाठा
धरण पाणीसाठा (टक्केवारी)
राधानगरी 52
तुळशी 54
वारणा 40
दुधगंगा 21
कासारी 30
कडवी 42
कुंभी 47
पाटगांव 43
चिकोत्रा 50
चित्री 33
जंगमहट्टी 37
घटप्रभा 64
जांबरे 44
आंबओहोळ 70
सर्फनाला 28
धामणी 7
कोदे ल.पा. 33