रस्त्यांच्या कामांना १४ फेब्रुवारीपासून ब्रेक ?
ठेकेदारांची भूमिका
सात महिन्यांपासून ६३० कोटींची बिले थकित
पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींकडे मागणी
कोल्हापूर
जिल्ह्यातील रस्त्यासह विविध विकासकामे घेणाऱ्या ठेकेदारांची सात महिन्यापासून बील मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी 14 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कन्स्ट्रक्शन असोसिएशनने रविवारी पालकमंत्री आबिटकर यांच्यासह आमदार, खासदारांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे.
यामध्ये म्हटले, सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यात 85 हजार कोटींची कामे मंजूर केली. मात्र, तरतूद 8 हजार कोटींची केली. शासनाने ज्या प्रमाणात कामे काढलीत त्या प्रमाणात निधीचे नियोजन केले नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात ठेकेदारांच्या वाट्याला केलेल्या कामाच्या देयकापोटी अत्यल्प निधी वितरीत केला गेला. सध्या सा. बा. विभागाकडे डिसेंबर अखेर अंदाजे 16 हजार कोटींची प्रलंबित देयके आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 630 कोटोचे बील थकले आहे. सात महिने कोणत्याही कामापोटी ठेकेदारांना कुठले ही देयक प्राप्त झालेले नाही. त्यामुळे ठेकेदार प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर, टेक्निकल स्टाफ, अकौंट स्टाफ अडचणीत आले आहेत. तरी या आर्थिक चक्रातून बाहेर येण्यासाठी थकलेली बील मिळावे. यावेळी रमेश भोजकर, डी.वाय. भोसले, मयुर भोसले, मिलींद साखरपे, उमेश पाटील, सचिन कोळी, संजय पाटील आदी उपस्थित होते.