वायनाडच्या जनतेच्या विश्वासाचा भंग
भाजप उमेदवार नव्या हरिदास यांची टीका
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसने प्रियांका वड्रा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने त्यांच्या विरोधात महिला मोर्चाच्या राज्य महासचिव नव्या हरिदास यांना मैदानात उतरविले आहे. तर वायनाड मतदारसंघात भाकपने सत्यन मोकेरी यांना उमदेवारी दिली आहे.
नव्या हरिदास यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर काँग्रेस आणि गांधी परिवारावर निशाणा साधला. गांधी परिवार वायनाडचा आवाज संसदेत उपस्थित करण्यास अपयशी ठरला आहे. गांधी परिवारासाठी वायनाड हा एक पर्याय किंवा दुसरा मतदारसंघ आहे. वायनाडची जनताही आता हे ओळखून चुकल्याचे नव्या हरिदास यांनी म्हटले आहे.
खरोखरच स्वत:सोबत उभा राहणारा आणि समस्यांवर उपाय करणारा नेता वायनाडच्या जनतेला हवा असल्याचे नव्या हरिदास यांनी नमूद पेले आहे. नव्या हरिदास या कोझिकोड महापालिकेच्या नगरसेविका म्हणून दोनवेळा निवडून आल्या आहेत.
प्रियांका वड्रा वायनाडसाठी अनोळखी
उत्तर भारतात प्रियांका वड्रा या नव्या चेहरा नाहीत. परंतु वायनाडसाठी त्या निश्चितपणे नव्या आहेत. प्रियांका वड्रा या गांधी परिवाराच्या प्रतिनिधी म्हणून येत आहेत. हा परिवार संसदेत वायनाडचे मुद्दे उपस्थित करण्यास अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
वायनाडला केले दुर्लक्षित
वायनाडच्या लोकांनी पुढील 5 वर्षांपर्यंत प्रतिनिधित्व करतील या विश्वासासोबत राहुल गांधींना जनादेश दिला होता. परंतु राहुल गांधी यांनी रायबरेलीची निवड करत वायनाडकडे दुर्लक्ष केले आहे. याचमुळे या मतदारसंघाला गांधी परिवार केवळ एक पर्याय म्हणून पाहत असल्याची जाणीव वायनाडच्या जनतेला झाली असल्याचा दावा नव्या हरिदास यांनी केला.
महिला मोर्चाच्या महासचिव
भाजपकडून उमेदवारी मिळणे माझ्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक होते. 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वायनाडमध्ये पक्षाची मते वाढणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे. नव्या हरिदास या केरळमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या राज्य महासचिव आहेत. वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सोडण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे.