बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाला ब्राझिल शिष्टमंडळाची भेट
बेळगाव : काहेर संचालित बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे ब्राझील येथील फ्लोरियानोपोलीसमधील माधव इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद अँड योगा संस्थेच्या शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात आले. हे शिष्टमंडळ 22 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर अखेर आयुर्वेद उपचारांचे शिक्षण घेणार आहेत. या शिष्टमंडळात 2 विद्यार्थी व 5 रुग्णांचा समावेश आहे.
काहेर ही आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे आपल्या शैक्षणिक कार्याचा जागतिक विस्तार मजबूत करण्यासाठी कार्यरत आहे. कुलगुरु डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने आयुर्वेद शिक्षण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून अनेक सामंजस्य करारही विविध आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत करण्यात आले आहेत. त्यानुसार ब्राझीलचे शिष्टमंडळ आयुर्वेदाचे शिक्षण घेण्यासाठी आले आहे.
या शिष्टमंडळातील दोन विद्यार्थी आयुर्वेदिक बालरोग, आयुर्वेद कर्करोग या विषयांवर सखोल माहिती घेणार आहेत. तसेच ब्राझीलमधील पाच रुग्ण प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया, इस्नोमिया, बीपी, थायरॉईड, स्पायनल, डिझरेशन व पार्किंन्सन डिसिज आदी आजारांवरील उपचाराबाबत शिक्षण घेणार आहेत. हे शैक्षणिक उपक्रम डॉ. सुहासकुमार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत.
आरोग्यविषयक विकासाला चालना
या उपक्रमामुळे परस्पर शैक्षणिक व आरोग्यविषयक विकासाला चालना मिळाली असून, भविष्यात संयुक्त संशोधन प्राध्यापक व विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम, समन्वयक आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या भागिदारीमुळे ब्राझीलमधील रुग्णांसाठी आयुर्वेद शिक्षण व आरोग्य सेवा उपलब्धतेचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. आदिब ए. यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.