ब्राझील-अमेरिका सुवर्णपदकासाठी लढत
वृत्तसंस्था/मार्सेली
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या फुटबॉल या क्रीडा प्रकारात ब्राझील आणि अमेरिका यांच्यात सुवर्णपदकासाठी अंतिम सामना होईल. ब्राझील संघाने विश्वविजेत्या स्पेनचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
ब्राझील आणि स्पेन यांच्यातील या सामन्याला शौकिनांची प्रचंड गर्दी झाली होती. ब्राझील संघातर्फे गॅबी पोर्टिलो आणि अॅड्रीना यांनी गोल नोंदविले. स्पेनच्या इरेनी पॅरेडेसने नजर चुकीने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू मारत ब्राझीलला हा बोनस गोल बहाल केला. ब्राझीलच्या अनुभवी 38 वर्षीय मार्टाचा हा शेवटचा सामना आहे. 38 वर्षीय मार्टा या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त होत आहे. गेल्यावर्षी झालेल्या महिलांच्या विश्व फुटबॉल स्पर्धेत स्पेनने विजेतेपद मिळविले होते. पॅरेडेसने 6 व्या मिनीटाला आपल्याच संघाच्या गोलपोस्टमध्ये गोल मारत ब्राझीलला खाते उघडून दिले. सामन्यातील पहिल्या स्टॉपेज कालावधीत पोर्टिलोने ब्राझीलचा दुसरा गोल केला. अॅड्रीयानाने 71 व्या मिनीटाला हेडरव्दारे गोल नोंदवून ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. सलमा पॅरालेलोने स्पेनचे खाते 85 व्या मिनीटाला हेडरव्दारे उघडले. आता शनिवारी स्पेन आणि जर्मनी यांच्यात कास्यपदकासाठी सामना होईल.