For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्राझील स्पर्धेबाहेर, नॉर्वेची 2-1 ने मुसंडी

06:56 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्राझील स्पर्धेबाहेर  नॉर्वेची 2 1 ने मुसंडी
Advertisement

दोन्ही गोलांची हालांदकडून नोंद, गोलरक्षक नायलँडकडूनही उत्कष्ट कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था, ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी : अर्लिंग हालांदने 79 व्या मिनिटाला आघाडी मिळवून देणारा ’हेडर’वरील गोल आणि त्यानंतर निर्धारित वेळेत आणखी एक गोल करत नॉर्वे संघाला आपल्या खांद्यावर पेलले आणि ब्राझीलचा 2-1 असा पराभव करून त्यांना पहिल्यांदाच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. फुटबॉलच्या या सर्वांत मोठ्या मंचावर या आघाडीपटूने आपली जबरदस्त छाप पाडली आहे.

नॉर्वेचा पुढील सामना शनिवारी फ्लोरिडातील मियामी गार्डन्स येथे इंग्लंडविऊद्ध होणार आहे. नॉर्वेचा गोलरक्षक ओर्जन नायलँडनेही उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने सुऊवातीलाच एक महत्त्वपूर्ण बचाव केला. 14 व्या मिनिटाला ब्रुनो गुइमारेसची पेनल्टी किक रोखण्यासाठी त्याने डावीकडे झेप घेतली. तसेच नॉर्वेकडे एका गोलची आघाडी असताना सामन्याच्या उत्तरार्धात एंड्रिकने मारलेला फटका त्याने आपल्या डाव्या हाताने अडवला. नायलँडने केवळ एकच गोल स्वीकारला आणि तो म्हणजे ‘स्टॉपेज टाइम’च्या शेवटी नेमारने मारलेली पेनल्टी किक. ज्यामुळे केवळ अंतिम निकालाच्या आकड्यांत बदल झाला.

Advertisement

35 वर्षीय गोलरक्षक नायलँड हा नॉर्वेच्या संघातील सर्वांत वयस्कर खेळाडू आहे. देशाच्या क्रीडा इतिहासातील, विशेषत: पुऊष गटातील, सर्वांत महत्त्वपूर्ण विजयांपैकी एक असलेल्या या ऐतिहासिक विजयात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. नॉर्वेच्या महिला संघाने 1995 मध्ये विश्वचषक जिंकला होता, परंतु पुऊष संघाने आतापर्यंत केवळ चार वेळाच स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे आणि 1998 नंतर त्यांना प्रथमच यंदा संधी मिळाली. यापूर्वी ते अंतिम 16 संघांची फेरी ओलांडून कधीच पुढे मजल मारू शकले नव्हते.

1986 मधील झिकोनंतर विश्वचषकातील पेनल्टी किकवर गोल करण्यात अपयशी ठरलेला गुइमारेस हा ब्राझीलचा पहिला खेळाडू ठरला. स्टार खेळाडू विनिअस ज्युनियरऐवजी गुइमारेसकडे ही जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयावर त्वरित शंका उपस्थित केल्या गेल्या आणि या निर्णयावर बराच काळ प्रश्न उपस्थित केले जाण्याची तसेच टीका होण्याची शक्यता आहे. सामन्यात ब्राझीलने इतरही अनेक संधी वाया घालविल्या. उदाहरणार्थ, कासेमिरोने ‘क्रॉसिंग’चा प्रयत्न करताना नेमारला चेंडू पोहोचविण्यात चूक केली, अन्यथा यावेळी सामना बरोबरीत आणणारा गोल होऊ शकला असता.

आम्ही निर्माण केलेल्या संधींचे रूपांतर करण्यात नक्कीच कमी पडलो, असे कर्णधार मार्क्विनहोस नंतर म्हणाला. दुखापतग्रस्त मिडफील्डर लुकास पाक्वेटा याची अनुपस्थितीही त्यांना महागात पडली. दुसरीकडे, मध्यांतराच्या वेळी केलेल्या बदलांचा फायदा नॉर्वेचे प्रशिक्षक सोलबकेन यांना मिळाला. कारण त्यानंतर मैदानात आलेल्या श्जेल्डरपच्या मदतीनेच हालांदने आपले दोन्ही गोल केले.

 1990 नंतर प्रथमच ब्राझील उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच स्पर्धेबाहेर

पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझीलकडून ’विजयाची अपेक्षा होती. परंतु त्या तुलनेत त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आणि त्यांना मायदेशी परतावे लागले. यामुळे फुटबॉलमधील या जागतिक महाशक्तीची सलग आठ वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर ही मालिका खंडित झाली आहे. 1990 नंतर पहिल्यांदाच ते या टप्प्याआधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 2002 च्या अंतिम सामन्यात जर्मनीचा पराभव केल्यापासून, विश्वचषकाच्या बाद फेरीत युरोपियन प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध ब्राझीलचा हा सलग सातवा पराभव ठरला.

हालांदची मेस्सी, एमबाप्पेशी बरोबरी

सामन्याच्या सुऊवातीच्या काळात फारसा प्रभाव न पाडता आल्याने आणि चेंडूवर कमी ताबा मिळाल्याने दुसऱ्या सत्रातील ‘हायड्रेशन ब्रेक’दरम्यान हालांदने प्रशिक्षक स्टेल सोलबकेन यांच्याशी चर्चा केली. सोलबकेन यांनी त्याला आपली सर्व ऊर्जा पणाला लावून आक्रमक खेळण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे सर्वांत महत्त्वाच्या क्षणी हालांदने आपला खेळ उंचावला. मध्यांतराच्या वेळी मैदानात आलेल्या अँड्रियास शेल्डरपने दिलेल्या अचूक पासवर त्याने हेहर मारून चेंडूला जाळीत सारले. त्यानंतर काही मिनिटांतच हालांदने आणखी एक गोल केला, जो या स्पर्धेतील त्याचा सातवा गोल ठरला. डॅनिलोच्या पायांमधून चेंडू नेत त्याने हा गोल केला आणि ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत अर्जेंटिनाचा मेस्सी व फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्याशी बरोबरी साधली.

Advertisement
Tags :

.