हतबल दादा, वरचढ भाऊ
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय त्यांच्या स्वाधीन करून या प्रकरणात आपण हतबल आहोत, हे दाखवून दिले आहे. एकेकाळी स्पष्टवत्तेपणा आणि कठोर निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार आता स्वत: पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही आपल्या एका मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडू शकत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. कधीकाळी त्यांनी अनेक सहकाऱ्यांना कठोर निर्णयांमुळे अडचणीत आणले होते. आर. आर. पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांसारख्या नेत्यांना त्यांच्या स्पष्टवत्तेपणाचा फटका बसला होता. मग आज तेच दादा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत एवढे नरम कसे? बीडच्या घटनेमुळे महाराष्ट्राची संपूर्ण देशभर नाचक्की झाली आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आणि त्यावरून मोठे राजकीय वादळ उठले. बीडमधील सत्ता आणि मत्तेचे बेमुर्वतखोर राजकारण उघडकीस आले. तिथली लूट उघडकीस आली. गुन्हेगारी स्वरूपाचा कारभार उघड झाला. राज्यभर दोन जातीत तेढ निर्माण झाला. खून, खंडणी, ठेकेदारी आणि प्रशासनातील जातीयवाद अशी अनेक गंभीर प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणातील वाल्मीक कराड हा आपलाच कार्यकर्ता आहे हे पहिल्या दिवशी अभिमानाने सांगणाऱ्या मुंडे यांची पोलखोल करण्यात आली. सत्ताधाऱ्यांची यात पुरती नाचक्की झाली. एवढ्या गंभीर प्रकरणावर अजित पवार शांत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर एवढ्या मोठ्या आरोपांचे सावट असताना ते गप्प का? त्यांच्या स्वत:च्या राजकीय कारकिर्दीत त्यांना चुकीच्या निर्णयांसाठी जबाबदार धरले गेले आहे, मग यावेळी ते कोणत्या दबावामुळे धनंजय मुंडे यांना संरक्षण देत आहेत? भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्यांसाठी आक्रमक भूमिका घेत. भ्रष्टाचार, नैतिक मुद्दे किंवा अन्य कोणत्याही कारणावरून त्यांनी विरोधी पक्षातीलच नव्हे, तर आपल्या पक्षातीलही नेत्यांना हटवले. मग आता, जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातीलच एका मंत्र्याला इतक्या मोठ्या वादळाला तोंड द्यावे लागत आहे, तेव्हा त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात त्यांना अडचण का येते आहे? बीडमधील प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या सरपंचाचा मृत्यू ही काही छोटी घटना नाही. सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. एवढेच नव्हे, तर या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थी केल्याचेही समोर आले. पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या होऊनही भाजपने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली नाही, ही बाब लक्षवेधी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील या विषयावर मौन बाळगून आहेत. त्यामुळे या प्रकरणात पक्षाने कोणत्या बाजूने भूमिका घेतली आहे, हे स्पष्ट होत नाही. महाराष्ट्रातील जनतेला नेत्यांची अशी वागणूक किती दिवस सहन करावी लागणार? जनता एवढ्या मोठ्या घडामोडींवर गप्प का आहे? या प्रकरणात स्पष्टपणे काहीही घडताना दिसत नाही, आणि त्यामुळे लोकांच्या मनात सरकारच्या निक्रियतेबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊनही सरकार योग्य ती पावले उचलत नाही, ही गंभीर बाब आहे. सत्ताधारी पक्षात दबावाचे राजकारण खेळले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी पक्षाने माघार घेतली आहे का? अजित पवार यांना हे प्रकरण हाताळण्यात कोणती अडचण येते आहे? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. याशिवाय, विरोधकांनीही या प्रकरणात प्रभावी भूमिका घेतलेली दिसत नाही. मागील काळात विरोधी पक्ष अशा प्रकरणांवर आक्रमक असायचा, मात्र यावेळी त्यांनी फारसा आवाज उठवलेला नाही. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणाला पुढे न्यायचे नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. विरोधकांनी संपूर्ण ताकद लावून सरकारला जाब विचारला पाहिजे, पण तशी परिस्थिती दिसत नाही. एकूणच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवार यांनी घेतलेली भूमिका, भाजपच्या नेत्यांनी दाखवलेली संमिश्र प्रतिक्रिया आणि विरोधकांचा कमी झालेला आक्रमकपणा हे सर्व पाहता, या प्रकरणात एक वेगळेच राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील जनता हे राजकारण समजून आहे. मात्र, हे प्रकरण कुठपर्यंत जातं आणि त्याचा पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गत अधिवेशनात सुरेश धस यांनी सभागृहात ज्या पद्धतीने घटना पट मांडला त्यामुळे महाराष्ट्र कळवळला. त्या कृत्यांच्या कहाण्या ऐकताना लोकांच्या अंगावर शहारे आले. महाराष्ट्र ढवळून निघाला. त्यानंतर राजकारणी जे वागत आहेत त्यातून घृणा निर्माण होत आहे. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिमंडळातून वगळणे फारसे अवघड नाही. मात्र तो मित्रपक्षाचा अंतर्गत मामला आहे अशी जर मुख्यमंत्र्यांची भूमिका असतील तर ती त्यांच्या आजपर्यंतच्या प्रतिमेला धक्का पोहोचवते. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांनी अशा घटनेला अपवाद करणे योग्य ठरत नाही. याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी मुंडे आणि धस यांच्यामध्ये समेट घडवण्याचा आपण प्रयत्न केला आणि आपल्यामुळे दोनदा बोलणी झाली असे सांगून महाराष्ट्राला चक्राऊन सोडले आहे. सुरेश धस ज्या पद्धतीने मुंडे यांना भेटले आणि आपल्या भेटीचे त्यांनी समर्थन केले ते तर धक्कादायकच आहे. मृत सरपंच देशमुख यांच्या पत्नीला नोकरी लावली असे सांगून हे प्रकरण सत्तापक्षाने मिटवले आहे असे जे वातावरण निर्माण केले आहे, त्यातून भविष्यातील महाराष्ट्राचे राजकारण हे मांडवलीचे राजकारण ठरायला वेळ लागणार नाही. एका जीवाची किंमत एक नोकरी असेल आणि हतबल कुटुंबाचा असा गैरफायदा घेतला जात असेल तर भविष्यात हे महाराष्ट्राच्या राजकारणाला महागात पडणार आहे. अशा प्रकारची कृती करून नेते जो संदेश देत आहेत तो महाराष्ट्राचे झपाट्याने गुन्हेगारी करणाकडे वाटचाल करणारा ठरू शकतो. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर ही मिटवा मिटवी सुरू झाली का? आणि आपल्या हाती काही महत्त्वाचे लागले असे समजून अजित दादांनी धनंजय मुंडेंवर निर्णय सोपवले का? हे लवकरच समजेल. पण ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते काही बरे नव्हे.