मानधनाला मागे टाकत ब्रंट अग्रस्थानी
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हर ब्रंटने भारताच्या स्मृती मानधनाला खाली खेचत अग्रस्थान पटकाविले.
या मानांकन यादीत भारताच्या हरमनप्रित कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचे स्थान वधारले आहे. 2023 साली इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हर ब्रंटने वनडे फलंदाजांच्या मानांकनात अग्रस्थान मिळविले होते. अलिकडेच झालेल्या भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत नॅट सिव्हर ब्रंटने 160 धावा जमविल्या. मात्र इंग्लंडला ही मालिका 1-2 अशी गमवावी लागली. या मालिकेत स्मृती मानधनाने 115 धावा जमविल्या होत्या. मानधनाचे स्थान एक अंकाने घसरला असून ती आता 728 मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून नॅट सिव्हर ब्रंट 731 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. कर्णधार हरमनप्रित कौर 11 व्या स्थानावर असून रॉड्रिग्ज 13 व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या दीप्ती शर्माने आपले चौथे स्थान कायम राखले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅश गार्डनर पहिल्या तर मेगन स्कुट दुसऱ्या तर सोफी इक्लेस्टोन तिसऱ्या स्थानावर आहे.