टप्प्याटप्प्याने होणार मेंदूचे ‘नूतनीकरण’
मानवाचा मेंदू हा जीवसृष्टीतील सर्वात गहन आणि गुंतागुंतीचा अवयव मानला गेला आहे. या मेंदूवर संशोधक अनेक प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग मेंदूची टप्प्याटप्प्याने ‘रिप्लेसमेंट’ किंवा नूतनीकरण करणे हा आहे. हे कशासाठी करायचे तर, वृद्धापकाळ टाळण्यासाठी. अमेरिकेच्या प्रशासनाच्या अंतर्गत असणाऱ्या युएस अॅडव्हान्स्ड प्रोजेक्टस् एजन्सी नामक संशोधन संस्थेने नुकताच जीन हेबर्ट नामक एका संशोधकाला मेंदूवरच्या प्रयोगांसाठी नियुक्त केले आहे. हेबर्ट यांच्या म्हणण्यानुसार मानवाच्या मेंदूचे टप्प्याटप्प्याने ‘नूतनीकरण’ केले जाऊ शकते, जेणेकरुन तो सातत्याने ‘नवा’ राहील. तसे करता आल्यास माणसाची वृद्धावस्था प्रदीर्घकाळ पर्यंत टाळली जाऊ शकेल. केवळ मेंदूच्याच संदर्भात नव्हे, तर मानवाच्या कोणत्याही अवयवासंदर्भात असे केले जाऊ शकते. त्यामुळे माणसाचे आयुष्य सध्याच्या तिप्पट वाढवले जाऊ शकते. इतकेच नव्हे, तर असंख्य दशके तो कार्यरत राहू शकतो.
या प्रयोगाचे असंख्य लाभ असल्याचे बोलले जाते. पक्षाघात, अर्धांगवायू, स्मरणविहीनता, कंपवात इत्यादी मेंदूशी संबंधित विकारांवर मेंदूच्या नूतनीकरणामुळे मात करता येऊ शकते, असा संशोधकांचा विश्वास आहे. याशिवाय आणखी लाभ म्हणजे माणसाच्या आयुष्यात वाढ होणे हा आहे. अद्याप हे प्रयोग अगदीच बाल्यावस्थेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांचा लाभ मिळण्यास केव्हा प्रारंभ होणार, यासंबंधी सध्या कोणतेही समयसीमा नाही. तथापि, हे प्रयोग यशस्वी झाल्यास मेंदूसंबंधीच्या अनेक समस्यांवर प्रभावी तोडगा मिळू शकतो, यावर सध्यातरी संशोधकांचे एकमत आहे. हे प्रयोग भविष्यात कोणते स्वरुप धारण करतात, हे कालांतरानेच लक्षात येणार आहे.