For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोक्याच्या वर ‘मेंदू’

06:31 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
डोक्याच्या वर ‘मेंदू’
Advertisement

संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. तो आपल्या डोक्याच्या ‘आत’, अर्थात आपल्या कवटीच्या आत सुरक्षित बसविला जाण्याची व्यवस्था निसर्गानेच केली आहे. तथापि, चीनमध्ये एका युवकाचा ‘मेंदू’ त्याच्या डोक्याच्या वर उगवला होता. निदान लांबून पाहणाऱ्याला तरी तसे दिसत होते. या युवकाने हा त्रास 9 वर्षे सहन केला. अखेर डॉक्टरांनी त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करुन त्याची या त्रासातून सुटका केली आहे.

Advertisement

सध्या या प्रकाराची बरीच चर्चा होत आहे. डोक्याच्या वर मेंदू असण्याची ही जगातील प्रथमच घटना असावी, अशी टिप्पणीही होत आहे. तथापि, मेंदू डोक्यावर उगवला आहे, असे दिसत असले, तरी हा प्रकार थोडासा वेगळा आहे. या युवकाचा मेंदू खरेतर सामान्यपणे जसा असतो, तसा त्याच्या डोक्यातच आहे. पण काही कारणामुळे किंवा आजारामुळे त्याच्या डोक्याची त्वचा इतकी जाड झाली होती, की तिच्यावर मेंदूवर असतात तशा रेषा आणि घड्या दिसू लागल्या होत्या. त्यामुळे लांबून पाहणाऱ्याला मेंदूच डोक्याबाहेर आला आहे, किंवा तो डोक्यावर उगवला आहे, असे दिसत असे. त्यामुळे या युवकाला पाहताच लोकांच्या मनात भीती निर्माण होत असे आणि ते त्याला टाळत असत. याचा त्याला त्रास होत असे. हा विकार या युवकाला त्याच्या वयाच्या 14 व्या वर्षापासून होता. अचानक, त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाची त्वचा जाड होऊ लागली आणि ती लांबून मेंदूसमान दिसू लागली होती. त्याने हा त्रास घालविण्यासाठी अनेक उपाय केले. प्रथम केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली होती. मात्र, नंतर चीनमधील ‘वुहान’ विद्यापीठात त्याच्या या विकाराचे योग्य निदान करण्यात आले. त्याला ‘क्युटीस व्हर्टिसीस जाईराटा’ नामक विकार झाल्याचे निष्पन्न झाले. या विकारात डोक्यावरची त्वचा बरीच जाड होते आणि तिला मेंदूवर असतात तशा सुरकुत्या पडतात. त्यामुळे ती लांबून मेंदूसारखी दिसते. विकाराचे अचूक निदान झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्या करण्यात आल्या आहेत. आता त्याची या विकारातून मुक्तता झाली असून तो सर्वसामान्य माणसाप्रमाणे दिसू लागला आहे. त्यामुळे त्याच्यावरील दडपणही आता पूर्णत: दूर झाले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.