For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुमराह नावाचं ब्रह्मास्त्र

06:35 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बुमराह नावाचं ब्रह्मास्त्र
Advertisement

भारतात सुऊवातीला वेगवान गोलंदाजांची परंपरा नव्हती. 1950 ते 60 च्या दशकात रमाकांत देसाई नावाचं एक मोठं वादळ येऊन गेलं. त्यानंतर 1971 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय चमूमध्ये सिंधुदुर्ग जिह्यातील देवबाग गावचे रहिवासी पांडुरंग साळगावकर यांचा समावेश होता. यांचा मारा किती वेगवान होता याबद्दल दस्तुरखुद्द सिंधुदुर्गचे सुपुत्र सुनील गावसकर गुऊजींनी आपल्या ‘सनी डेज’ या आत्मचरित्रात छान वर्णन केले. ते म्हणतात, मी विंडीज, ऑस्ट्रेलिया यांचा तोफखाना विना हेल्मेटने परतवून लावला. तोही कुठलाही चेंडू शरीराला स्पर्श न होता. मात्र पांडुरंग साळगावकर यांनी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत मात्र माझ्या बोटांना दुखापत केली. ते पुढे लिहितात की, ज्यावेळी मी निवृत्त झालो त्यावेळी एक प्रदर्शनीय सामना झाला होता. पांडुरंग साळगावकरांनी पुन्हा मला शेकवलं. हा एकमेव असा गोलंदाज होता ज्याच्यासमोर माझी बोटं घाबरायची. यावरून आपण अंदाज बांधू शकाल की पांडुरंग साळगावकर यांच्याकडे किती वेग होता. त्यावेळी  चेंडूच्या स्पीड मोजण्याचे कुठलेही एकक नव्हतं. अन्यथा त्यांच्या वेगासमोर डेल स्टेनचा वेगही फिका पडला असता.

Advertisement

मला जेव्हापासून क्रिकेट समजायला लागलं (इयत्ता सहावी) त्या दिवसापासून ते आजपर्यंत बरेच भारतीय मध्यमगती, वेगवान गोलंदाज पाहिले. या सर्वांमध्ये दोघा- तिघांनी मला खऱ्या अर्थाने प्रभावित केलं. या सर्वात पहिला म्हणजे कपिल देव निखंज. प्रतिस्पर्धी संघाचे वीस गडी बाद करत सामना जिंकून देण्याची सवय या गोलंदाजाने लावली. दुसरा म्हणजे जवागल श्रीनाथ. ज्यांनी कपिल देवचा वारसा अगदी व्यवस्थित चालवला. परंतु श्रीनाथ निवृत्त झाल्यानंतर भारतीय पाटा खेळपट्टीवर कोण डोकं आपटणार आणि घाम गाळून कोण बळी मिळवणार, याचे उत्तर आपल्याला जसप्रीत बुमराहच्या रूपात मिळालं. त्याची आर्म अॅक्शन आणि ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करतो त्यामुळे फलंदाज गडबडतो. त्याच्याकडे बाउन्सर, वेग तर आहेच. परंतु त्याचा यॉर्कर हा आजही त्याच्यासाठी ब्रह्मास्त्र आहे. बरं, यॉर्कर टाकणारा हा पहिलाच गोलंदाज आहे का? असंही नाही. या अगोदर वकार, अक्रम, मलिंगा ही मंडळी होतीच की. परंतु या सर्वांना छेद देत अचूक यॉर्कर कसा असावा याचा परिपाठ बुमराहने घालून दिला. मध्यंतरीच्या काळात मंदगती गोलंदाजांचा खूपच बोलबाला होता. परंतु बुमराह आल्यानंतर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांना सुगीचे दिवस आले.

भारतीय क्रिकेटला भारतात फिरकीवर उदरनिर्वाह करण्याचे दिवस संपलेत, हे या पठ्ठ्याने दाखवून दिले. फार पूर्वी भारतात परदेशातील वेगवान गोलंदाज यायला टाळायचे. कारण काय तर भारतातील पाटा खेळपट्टी. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली. याच हॅडलीने 90 ते 95 टक्के बळी भारताबाहेर घेतले. क्रिकेटमध्ये जगातील मोजकेच गोलंदाज असे आहेत की ते कुठल्याही खेळपट्टीवर विकेट घेण्यास सक्षम असतात. उदाहरण द्यायचे झालं तर शेन वॉर्न आणि अँडरसन ही त्यापैकीच एक. आता त्यांच्याच यादीत बुमराह जाऊन बसलाय. जर तुमच्याकडे वेग, यॉर्कर आणि बाऊन्सर अचूक असेल तर तुम्ही जगातील कुठल्याही खेळपट्टीवर मॅचविनर गोलंदाज बनू शकता, हे जसप्रीत बुमराहने दाखवून दिले. बरं, हा टी-20 चाच राजा नाहीये. तर तो झटपट क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट यावर त्याच पटीने हुकूमत गाजवतो. किंबहुना काकणभर जास्तच म्हणा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुमराह आपल्या वैयक्तिक व क्रिकेटच्या जीवनात कधीही वादाच्या भोवऱ्यात सापडला नाहीये. आपण, आपलं क्रिकेट, आपला चेंडू आणि आपला यॉर्कर भला. असो.

Advertisement

आपल्याला वेस्टइंडीजमध्ये विश्व कप जिंकायचा असेल तर रोहित, विराट, पंत आणि जसप्रीत बुमराह यांना वेगवान खेळ हा करावाच लागेल यात काही शंका नाही. भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाजी जर आत्मा असेल पण अचूक गोलंदाजी हा कणा आहे हे बुमराहने सिद्ध केले एवढं मात्र खरं.

Advertisement
Tags :

.