पैशासाठी रेशनवरील तांदळाची विक्री केल्यास बीपीएल रेशनकार्ड करणार रद्द
बेळगाव तहसीलदारांचा इशारा : जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल
बेळगाव : राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारकांना अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दर महिन्याला प्रति माणसी दहा किलो तांदूळ दिला जात आहे. मात्र बहुतांशजण पैशासाठी रेशनवरील तांदळाची काळ्या बाजारात विक्री करत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेण्यात आली असून तांदळाची विक्री करताना आढळून आल्यास संबंधितांचे बीपीएल रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारकडून पंचहमी योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक असलेल्या अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारकांना दर महिन्याला 10 किलो तांदूळ देण्याचे जाहीर करण्यात आले होते. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर टप्प्याटप्प्याने पंचहमी योजना अमलात आणण्यात आल्या. केंद्र सरकारकडे अतिरिक्त तांदूळ पुरवठा करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला.
मात्र केंद्राने तांदूळ पुरविण्यावरून हात वर केले. अखेर राज्य सरकारने बीपीएल रेशनकार्डधारकांना प्रति माणसी 5 किलो तांदूळ तर उर्वरित 5 किलो तांदळाचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले. पण पैशाऐवजी 10 किलो तांदूळच देण्यात यावा अशी मागणी राज्य रेशन दुकानदार असोसिएशनने राज्य सरकारसह अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे लावून धरली होती. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून 10 किलो तांदूळ दिला जात आहे. मध्यंतरी 7 किलो तांदूळ व 3 किलो जोंधळा देण्यात आला. मात्र ही योजना अवघ्या दोन महिन्यात गुंडाळण्यात आली. सर्वसामान्य गरीब जनतेला खाण्यासाठी तांदूळ उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून अन्नभाग्य योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. मात्र सरकारच्या या योजनेचा बहुतांश बीपीएल रेशनकार्डधारकांकडून गैरफायदा उचलला जात आहे.
रेशनमध्ये मिळालेल्या तांदळाची मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात विक्री केली जात आहे. यासाठी भरमसाट पैसे आकारले जात आहेत. काळ्याबाजारात विक्री होणाऱ्या तांदळावरून अनेकवेळा वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. इतकेच नव्हे तर अन्न व नागरी पुरवठा आणि पोलीस खात्याकडून सातत्याने कारवाईदेखील केली जात आहे. एकंदरीत ही सर्व बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. कुटुंबाच्या उपयोगासाठी दिला जाणारा तांदूळ पैशापोटी काळ्याबाजारात विक्री करताना आढळून आल्यास संबंधितांचे बीपीएल कार्ड रद्द केले जाईल, असा इशारा बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ यांनी दिला आहे.