बॉइसन, गॉफ, अल्कारेझ, मुसेटी उपांत्य फेरीत
फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : मॅडिसन कीज, मायरा अँड्रीव्हा, टॉमी पॉल, फ्रान्सेस टायफो यांचे आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था/पॅरिस
अमेरिकेच्या कोको गॉफने दहा डबल फॉल्ट्स आणि एक सेटची पिछाडी भरून काढत आपल्याच देशाच्या मॅडिसन कीजचा पराभव करून प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे बिगरमानांकित फ्रान्सच्या लोइस बॉइसनने मायरा अँड्रीव्हाची विजयी घोडदौड रोखत उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कारेझ व लॉरेन्झो मुसेटी यांनीही शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. टॉमी पॉल व फ्रान्सेस टायफो यांचे आव्हान संपुष्टात आले.
दुसऱ्या मानांकित कोको गॉफने सातव्या मानांकित मॅडिसन कीजवर 6-7 (6-8), 6-4, 6-1 अशी मात करीत तिसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात दोघींनीही अनेक चुका केल्या. दोघींनीही एकेक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली आहे. दोघींनी मिळून एकूण 101 अनियंत्रित चुका केल्या तर फक्त 40 विजयी फटके मारले. बंद छताखाली झालेला हा सामना दोन तासाहून अधिक काळ रंगला होता. गॉफने 2023 मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकली तर 2022 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. गुरुवारी तिची उपांत्य लढत 361 व्या मानांकित फ्रान्सच्या वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या लोइस बॉइसनशी होईल. बॉइसनने सहाव्या मानांकित मायरा अँड्रीव्हाचे आव्हान 7-6 (8-6), 6-3 असे संपुष्टात आणत शेवटच्या चारमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळविले.
अल्कारेझ, मुसेटीची आगेकूच
पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने बाराव्या मानांकित अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-0, 6-1, 6-4 असा फडशा पाडत आगेकूच केली. याआधीच्या तीन सामन्यांत अल्कारेझला प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविण्यासाठी चार सेट्समध्ये संघर्ष करावा लागला होता. पण पॉलविरुद्ध त्याने सहज विजय मिळविला. ‘रोलाँ गॅरोवर आम्ही उपांत्यपूर्व सामने खेळतोय आणि ते कधीही सोपे नसतात. यापूर्वी मी दोनदा पॉलविरुद्ध हरलो आहे आणि त्याच्याविरुद्धचा सामना नेहमीच अवघड जातो. यामुळेच मला सामन्यावर लक्ष केंद्रित करून त्याला संधी न देण्यावर भर देता आला,’ असे अल्कारेझ नंतर म्हणाला. पहिले दोन सेट एकतर्फी गमविल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये
टॉमी पॉलने बऱ्यापैकी प्रतिकार 4-4 अशी बरोबरी साधली होती. पण नंतर त्याला हा जोम टिकविता आला नाही आणि अल्कारेझने सेटसह सामना संपविला. त्याची उपांत्य लढत आठव्या मानांकित इटलीच्या लॉरेन्झो मुसेटीशी होईल. मुसेटीने बेसलाईनवर उत्तम खेळ करीत फटक्यांचे वैविध्य दाखवले आणि अमेरिकेच्या 15 व्या मानांकित फ्रान्सेस टायफोचे आव्हान 6-2, 4-6, 7-5, 6-2 असे संपुष्टात आणत आगेकूच केली. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.