For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

न्यूझीलंड अ च्या डावात बॉईलचे नाबाद शतक

06:06 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंड अ च्या डावात बॉईलचे नाबाद शतक
Advertisement

वृत्तसंस्था, ख्राईस्टचर्च

Advertisement

येथे सुरु असलेल्या चार दिवसांच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर मॅथ्यू बॉईलच्या नाबाद शतकाने न्यूझीलंड अ संघाचा पहिला डाव सावरला. दिवसअखेर न्यूझीलंड अ ने पहिल्या डावात 3 बाद 218 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी भारत अ चा पहिला डाव 346 धावांवर आटोपला. कर्णधार ध्रुव जुरेलने शानदार शतक तर आकाश दीपने अर्धशतक नोंदविले.

भारत अ संघाने 7 बाद 291 या धावसंख्येवरुन रविवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या तीन फलंदाजांनी 55 धावांची भर घातली. 99 धावांवर नाबाद राहिलेल्या कर्णधार जुरेलने आपले शतक 171 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. तो 105 धावांवर बाद झाला. आकाशदीपने 116 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 68 धावा झळकविल्या. न्यूझीलंड अ संघातील रँडेलने जुरेलला बाद केले. त्यानंतर क्लार्कने आकाश दीपचा बळी मिळविला. मुकेशकुमार 5 धावांवर नाबाद राहिला. भारत अ चा डाव 346 धावांवर आटोपला. न्यूझीलंड अ संघातर्फे शीटने 63 धावांत 4 तर रँडेल आणि मॅके यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement

भारत अ संघाच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंड अ संघाची पहिल्या 8 षटकात स्थिती 3 बाद 13 अशी केविलवाणी होती. मोहम्मद सिराजने कर्णधार मारियूला 4 धावांवर बाद केले. त्यानंतर मुकेश कुमारने हिफेला 4 धावांवर तर रॉबिनसनला 3 धावावर बाद केले.

मॅथ्यू बॉईल आणि फॉक्स क्रॉप यांनी न्यूझीलंड अ संघाचा डाव चांगलाच सावरला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 205 धावांची द्विशतकी भागिदारी केली. बॉईलने 1 षटकार आणि 14 चौकारांसह 148 चेंडूत नाबाद 107 धावा तर फॉक्स क्रॉपने 180 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 80 धावा जमविल्या. न्यूझीलंड अ संघ अद्याप 128 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.

संक्षिप्त धावफलक - भारत अ प. डाव सर्वबाद 346 (ध्रुव जुरेल 105, आकाश दीप 68, शीट 4-63, रँडेल आणि मॅके प्रत्येकी 2 बळी), न्यूझीलंड अ प. डाव 3 बाद 218 (बॉईल खेळत आहे 107, फॉक्स क्रॉप खेळत आहे 80, मारीयू 4, हिफे 4, रॉबिनसन 3, मुकेश कुमार 2-44, सिराज 1-49).

Advertisement
Tags :

.