प्रेयसीचा गळा चिरून प्रियकराची आत्महत्या
बेळगावच्या नाथ पै सर्कल येथील घटना : घटनेला प्रेमप्रकरणाची किनार : लग्नाच्या विषयावरून झाली वादावादी
बेळगाव : प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा चाकूने गळा चिरून खून केल्यानंतर प्रियकरानेही त्याच चाकूने स्वत:चा गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. 4 रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान नाथ पै सर्कल येथे घडली आहे. ऐश्वर्या महेश लोहार (वय 18, रा. नवी गल्ली, शहापूर) आणि प्रशांत यल्लाप्पा कुंडेकर (वय 28 रा. कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर) अशी मयत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, ऐश्वर्या आणि प्रशांत या दोघांची गेल्या दीड वर्षांपासून मैत्री होती.
मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले होते. त्यामुळे हे दोघेजण वारंवार ऐकमेकांना भेटत होते. तसेच प्रशांत हा गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याकडे लग्नाची मागणी करत होता. त्याने ऐश्वर्याच्या आईलादेखील हे सांगितले होते. तुमच्या मुलीशी माझे लग्न करून द्या, अशी मागणी केल्यानंतर तू आधी व्यवस्थित कामाला जा, पैसे कमव त्यानंतर काही दिवसांनी तुमचा विवाह करून दिला जाईल, असे ऐश्वर्याच्या आईने त्याला सांगितले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. प्रशांत हा फरशी फिटिंगचे काम करत होता. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता.
दुपारी 4 नंतर कामावरून तो निघून गेला होता. सायंकाळी दोघेही नाथ पै सर्कल येथील ऐश्वर्याची लहान काकू सुवर्णा जयवंत लोहार यांच्या घरी गेले होते. घरी या दोघा व्यतिरिक्त अन्य कोणीही नव्हते. त्याठिकाणी जाताना प्रशांतने आपल्यासोबत विषाची बाटलीदेखील नेली होती. खोलीत शिरल्यानंतर लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वादावादी झाल्यानंतर प्रशांतने रागाच्या भरात ऐश्वर्याचा चाकूने गळा चिरून खून केला असावा व त्यानंतर स्वत:चा गळाही चिरून घेतला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. सायंकाळी 5.30 च्या दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून प्रथमदर्शीना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केट उपविभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्दाप्पा सिमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात हलविले. विधीविज्ञान तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. बुधवारी सकाळी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी भेट देऊन माहिती घेतली. सुरुवातीला दुहेरी हत्याकांड घडल्याची अफवा शहरात पसरली होती. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
विषाची बाटली तशीच पडून
ऐश्वर्याला भेटण्यासाठी गेलेल्या प्रशांतने आपल्यासोबत विषाची बाटलीदेखील नेली होती. मात्र विषाची बाटली उघडण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लग्नाच्या विषयावरून झालेल्या वादावादीनंतर प्रेयसीचा खून करून प्रियकरानेही स्वत:ला संपविले, असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शवचिकित्सा (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतर व प्रकरणाचा सखोल तपास झाल्यानंतरच उलगडा होणार आहे.
घरात रक्ताचा सडा
प्रेयसीचा गळा चिरून खून केल्यानंतर प्रियकरानेही स्वत: त्याच चाकूने आपला गळा चिरून घेऊन आत्महत्या केली. दोन्ही मृतदेह एकाच खोलीत पडल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन्ही मृतदेह हलविताना नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घडलेल्या या घटनेमुळे बेळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.