For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोकरभरती प्रकरणावरुन म्हापसा पालिकेत विरोधकांचा बहिष्कार

10:30 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोकरभरती प्रकरणावरुन म्हापसा पालिकेत विरोधकांचा बहिष्कार
Advertisement

म्हापसाच्या बाहेरील नियुक्ती करण्यास विरोध : एकाच विषयावरुन तिसऱ्यांदा बैठक तहकूब

Advertisement

म्हापसा : म्हापसा नगरपालिकेत म्हापशातील युवकांना नेकरीत सामावून न घेता म्हापसा बाहेरील सहाजणांना सामावून घेण्यात आले आहे. हा म्हापसावासियांवरील अन्याय आहे, असा ठपका ठेवत पालिकेतील 11 नगरसेवकांनी काल झालेल्या पालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांना बरेच धारेवर धरले. बेकायदेशीर नोकर भरतीला आमचा कदापि पाठिंबा नाही, असे सांगून या अकरा नगरसेवकांनी बैठकीतून  बाहेर पडत बहिष्कार घातला. या एकाच प्रश्नी तहकूब झालेली ही तिसरी बैठक आहे.

बहिष्कार घालणाऱ्यांमध्ये नगरसेवक डॉ. तारक आरोलकर, प्रकाश भिवशेट, अॅङ शशांक नार्वेकर, विराज फडते, कमल डिसोझा, केअल ब्रागांझा, सुधीर कांदोळकर, आनंद भाईडकर, अन्वी कोरगावकर, शुभांगी वायंगणकर, विकास आरोलकर यांचा समावेश आहे. नोकरभरतीचा हा विषय अॅङ शशांक नार्वेकर यांनी उपस्थित केला. त्याला नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी पाठिंबा देत नगराध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार केला. जोपर्यंत भरती प्रक्रिया विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत नियुक्त केलेल्या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुढील पगार देऊ नये. तसेच कायद्यानुसार योग्यरित्या प्रक्रिया पूर्ण करूनच ही भरती करावी असे या नगरेसवकांनी नगराध्यक्षांना स्पष्ट केले.

Advertisement

नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या, एकाने पालिका संचालकाकडे याचिका दाखल केली असून त्यामुळे आजच्या बैठकीत या नोकरभरतीचा विषय चर्चेत आणून त्यावर चर्चा करू शकत नाही. मात्र नगरसेवकांनी नगराध्यक्षांचे सर्व दावे खोडून  काढले. तुम्ही खोटारडेपणा करीत असून म्हापशेकरांची फसवणूक करीत असल्याचा आरोप यावेळी एकत्रित आलेल्या अकराही नगरसेवकांनी केला. नगरसेवक डॉ. तारक आरोलकर यांनी नोकर भरतीची फाईल बैठकीसमोर ठेवण्याची मागणी केली. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून त्यावर चर्चा करण्यास नगराध्यक्षांनी स्पष्ट नकार दिल्याने यावेळी सर्व नगरेसवकांनी संताप व्यक्त करीत नगराध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार केला. तरीसुद्धा नगराध्यक्ष ऐकत नसल्याचे पाहून अकरा नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.

म्हापशाच्या इतिहासात पहिलीच वेळ : भाईडकर

नगरेसवक आनंद भाईडकर म्हणाले की, या विषयावरील ही तिसऱ्यांदा बैठक होती. तरीही त्या विषयावर चर्चा घेण्यात आली नाही, आणि बैठक तहकूब करावी लागली. म्हापशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

नगराध्यक्षांनी खुर्ची खाली करावी : नार्वेकर

अॅड. शशांक नार्वेकर म्हणाले की, आज 19 नगरेसवक उपस्थित होते. नगराध्यक्षांना चुकीचे मार्गदर्शन मिळत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होऊ शकत नाही. गडेकर यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षाविरुद्ध वैयक्तिक तक्रार केली आहे.  म्हापशातील लोकांना नोकरी न देता म्हापसा बाहेरील तऊणांना नोकऱ्या देऊन बेकायदेशीरपणा केलेला आहे. नगराध्यक्षांनी आपली खुर्ची खाली करावी, अशी मागणीही नार्वेकर यांनी केली.

नगराध्यक्षांची भाषा खुर्चीला शोभत नाही : आरोलकर

नगराध्यक्षांनी जी भाषा वापरली ती त्यांच्या खुर्चीला शोभत नाही. बेकायदेशीर कृतीला आमचा पाठिंबा नाही. नोकरभरतीची फाईल आम्हाला दाखविली नाही म्हणून आम्ही या बेकायदेशीर कृत्यावर बहिष्कार घातला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका कमल डिसोझा, सुधीर कांदोळकर, अन्वी कोरगावकर यांनीही नगराध्यक्षांच्या कृतीचा निषेध केला.

नोकरभरती म्हापसापूर्तीच मर्यादित नाही : नगराध्यक्ष

नोकरभरतीची प्रक्रिया ज्या पद्धतीने करायला पाहिजे होती, ती आम्ही केलेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आम्ही खुलेआम चर्चा करू शकत नाही. त्यांना हे मत पटले नाही म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला. सर्वांनी आम्हाला सहाजणांच्या नोकरभरतीस मान्यता दिली आहे. ही नोकरभरती फक्त म्हापसापूर्तीच मर्यादित ठेवावी, असे कुठेही म्हटलेले नाही, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांनी दिली.

Advertisement
Tags :

.