मुलगा ‘बनून’ व्यायाम, आज चँपियन
नेहमीप्रमाणे शनिवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला आहे. या दिनाच्या निमित्ताने जगातील पराक्रमी महिलांच्या जीवनगाथांना प्रसिद्धी दिली जात आहे. एखाद्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी त्यांना प्रारंभीच्या काळात किती परिश्रम करावे लागले आणि कित्येकदा स्वत:चे ‘स्त्रीत्व’ लपवून कसे झगडावे लागले, याची माहितीही समोर येत आहे. जी क्षेत्रे महिलांसाठी अशक्यप्राय मानली गेली, त्यांच्यातही आज महिला लीलया संचार करताना दिसतात. पण काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. ब्रिटनच्या जागतिक बॉक्सर चँपियन कॅरोलिना डुबोस यांच्यासंबंधात घडलेला किस्सा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
आज जागतिक लाईटवेट बाँक्सिंग चँपियन असणाऱ्या डुबोस यांना त्यांच्या वयाच्या 9 व्या वर्षापासूनच बॉक्सिंगचे आकर्षण निर्माण झाले. मोठे बंधू हा खेळ खेळताना पाहून त्यांनाही ही स्फूर्ती आली. तथापि, ब्रिटनसारख्या प्रगत देशातही हा खेळ मुलींचा नव्हे, अशीच समजूत दोन-अडीच दशकांपूर्वी होती. त्यामुळे स्पर्धांमध्ये महिला बॉक्सिंग ही श्रेणी नव्हती. त्यामुळे त्यांना आपण ‘मुलगा’ आहोत असे भासवून प्रारंभी बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रात आणि व्यायाम शाळेत प्रवेश मिळवावा लागला. चार महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अधिक चांगले शिक्षण घेण्यासाठी अन्य प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. येथे मात्र, त्यांनी आपण मुलगा नसून मुलगी आहोत, ही बाब उघड केली. त्यांची या क्षेत्रातील प्रगती बघून त्यांच्या प्रशिक्षकांनाही त्यांचे उत्तरदायित्व स्वीकारले,. आज त्या जागतिक चँपियन आहेत. आज महिलांना बॉक्सिंग खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी विरोध होत नाही, ही बाब सकारात्मक आहे, असे त्या मानतात. आपल्याला प्रारंभी ज्या विरोधाशी संघर्ष करावा लागला, त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. कोणत्याही विषयाच्या प्रारंभी असे होतच असते, असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले आहे.