भारतीय बॉक्सिंग महासंघाने स्वीकारले नवे वजनी गट
वृत्तसंस्था/ बरेली
वेगळ्या स्थापन करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड बॉक्सिंग’ने केलेल्या वर्गीकरणानुसार, भारतीय बॉक्सिंग महासंघाने 10 वजनी गटांमध्ये पुरुषांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. सध्या सुरू असलेली स्पर्धा ‘वर्ल्ड बॉक्सिंग’च्या तांत्रिक आणि स्पर्धा नियमांतर्गत आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये 13 ऐवजी 10 वजनी गट आहेत. निलंबित आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने 13 वजनी गट ठरविले होते.
नवीन वजनी गट 50 किलो (फ्लायवेट), 55 किलो (बँटमवेट), 60 किलो (लाईटवेट), 65 किलो (वेल्टरवेट), 70 किलो (लाईट मिडलवेट), 75 किलो (मिडलवेट), 80 किलो (लाईट हेविवेट), 85 किलो (क्रूझरवेट), 90 किलो (हेविवेट) आणि 90 किलोंहून अधिक (सुपर हेविवेट) असे आहेत. यापैकी 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 80 किलो आणि 90 किलो या वजनी गटांकडे संभाव्य ऑलिम्पिक वजनी गट म्हणून पाहिले जात आहे.
महिलांसाठी 48 किलो (लाइट फ्लायवेट) हा आरंभीचा गट असून त्यानंतर 51 किलो (फ्लायवेट), 54 किलो (बँटमवेट), 57 किलो (फेदरवेट), 60 किलो (लाइटवेट), 65 किलो (वेल्टरवेट), 70 किलो (लाइट मिडलवेट), 75 किलो (मिडलवेट), 80 किलो (लाईट हेविवेट), 81 किलोंहून अधिक (हेविवेट) असे गट आहेत. वर्ल्ड बॉक्सिंग ही आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून मान्यता मिळविण्याचे आणि बॉक्सिंग ऑलिम्पिकमध्ये टिकवून ठेवण्याचे लक्ष्य बाळगून आहे. भारत काही आठवड्यांपूर्वीच या संघटनेत सामील झाला आहे.