बारा बळींसह खेळाचा तिसरा दिवस गोलंदाजांचा
वृत्तसंस्था/ बडोदा
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरु असलेल्या यजमान बडोदा आणि विद्यमान रणजी विजेता मुंबई यांच्यातील अ गटातील सामन्यात रविवारी खेळाचा तिसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. दिवसभरात एकूण 12 गडी बाद झाले. तनुश कोटीयनच्या फिरकी समोर बडोदा संघाचा दुसरा डाव 185 धावांत आटोपला.
या सामन्यात बडोदा संघाने पहिल्या डावात 290 धावा जमविल्यानंतर मुंबईचा पहिला डाव 214 धावांत संपुष्टात आल्याने बडोदाने 76 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. तनुश कोटीयनच्या फिरकीसमोर बडोदा संघाचा दुसरा डाव 60.3 षटकात 185 धावांत आटोपल्याने मुंबईला निर्णायक विजयासाठी 262 धावांची गरज आहे. तत्पूर्वी मुंबईने दिवसअखेर दुसऱ्या डावात 2 बाद 42 धावा जमविल्या. मुंबईला शेवटच्या दिवशी विजयासाठी 220 धावांची गरज असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.
बडोदा संघाच्या दुसऱ्या डावामध्ये कर्णधार कृणाल पंड्याने 55 तर अतित सेठने 26 धावा जमविताना सातव्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी केली. त्यानंतर महेश पी. याने 40 धावा जमविल्याने बडोदा संघाला 185 धावांपर्यंत मजल मारता आली. तनुश कोटीयनने 61 धावांत 5 गडी बाद केले. कोटीयनला हिमांशू सिंगने चांगली साथ देताना 50 धावांत 3 गडी बाद केले. मुंबईच्या दुसऱ्या डावात सलामीचा पृथ्वी शॉ 12 धावांवर तर हार्दिक तमोरे 6 धावांवर बाद झाले. म्हात्रे 19 तर कर्णधार रहाणे 4 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक - बडोदा प. डाव 290, मुंबई प. डाव 214, बडोदा दु. डाव 185 (कृणाल पंड्या 55, अतित सेठ 26, महेश 40, कोटीयन 5-61, हिमांशू सिंग 3-50), मुंबई दु. डाव 2 बाद 42 (पृथ्वी शॉ 12, तमोरे 6, अजिंक्य रहाणे खेळत आहे 4, म्हात्रे खेळत आहे 19).
सिद्धेश वीरचे शतक
श्रीनगर : 2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरु असलेल्या सामन्यात जम्मू काश्मिरच्या पहिल्या डावातील 9 बाद 519 या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रने पहिल्या डावात दिवस अखेर 6 बाद 312 धावा जमविल्या. महाराष्ट्रच्या डावामध्ये सिद्धेश वीरने 127 धावा झोडपल्या तर ऋतुराज गायकवाडने 86 धावांचे योगदान दिले. जम्मू काश्मिरतर्फे सलामने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक-जम्मू काश्मिर प. डाव 9 बाद 519 डाव घोषित, महाराष्ट्र प. डाव 86 षटकात 6 बाद 312 (सिद्धेश वीर 127, ऋतुराज गायकवाड 86, रसिक सालेम 2-57).