कर्म आणि अकर्म ह्यातील सीमारेषा अगदी पुसट असते
अध्याय चौथा
भगवंत म्हणाले, लोक मला जसे भजतात, त्याप्रमाणे मीही त्यांना भजतो. ज्यांना कर्माच्या फळाची इच्छा असते ते लोक निरनिराळ्या देवतांची उपासना करतात. जे जे त्यांना हवे असते, ते ते सगळे त्यांना प्राप्त होते. खरे पाहता देणारा किंवा न देणारे कर्माशिवाय दुसरे कोणीही नसून या मनुष्यलोकात कर्मापासूनच फलप्राप्ती होते. या कर्माचा मी व्यवहारदृष्टीने जरी कर्ता असलो, तरी त्यापासून मला कोणतीही अपेक्षा नसल्याने मी अकर्ता, निर्विकार आहे.
जन्माला आलेल्या प्रत्येकाने ठरवून दिलेले कर्म केलेच पाहिजे हे सांगण्यावर संपूर्ण गीतेत भगवंतांचा भर आहे. अवतारकाळात भगवंतांना सुद्धा जन्माला आल्यावर कर्म हे करावेच लागते. भगवंत आहेत म्हणून त्यांना कोणतीही सूट मिळत नाही. स्वत: करत असलेल्या कर्माबद्दल बोलताना ते पुढील श्लोकात म्हणतात, अवतारकाळात मी माझे ठरलेले कर्म जरूर करतो पण कर्माच्या फळामध्ये माझी आसक्ती नसते, म्हणून कर्मे मला लिप्त करू शकत नाहीत. जो माझे हे तत्व जाणतो, तोही तसंच वागत असल्याने त्यालाही कर्म बाधत नाही.
कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज । माझे स्वरूप हे जाणे तो कर्मात हि मोकळा ।।14 ।।
केली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्त्व जाणुनी । तैसी तू हि करी कर्मे त्यांचा घेऊनि तो धडा ।। 15 ।।
श्लोकांच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी ते करत असलेल्या कर्माबद्दल असे सांगितले की, मी कर्म करून फळाची अपेक्षा ठेवत नसल्याने मला कर्मे बांधून ठेऊ शकत नाहीत. हे माझे स्वरूप जाणून पूर्वीच्या मुमुक्षूनी कर्मे केली आहेत. आपण कर्मबंधनात अडकू शकू हे लक्षात घेऊन तसे होऊ नये ह्या उद्देशाने जे कर्म करतात त्यांना मुमुक्षु म्हणतात. तू देखील त्यांच्याप्रमाणे कर्म कर. नेमून दिलेली कर्मे जरी त्यांनी केली तरी त्यातून त्यांना फळाची अपेक्षा नसते. त्यामुळे त्यांची चित्तशुद्धी होऊन, ते करत असलेली कर्मेच त्यांना कर्मबंधनातून सोडवतात. ह्यात पथ्य एकच आहे ते म्हणजे अगदी विद्वान जरी झाला तरी कोणते कर्म करायचे हे त्याने मनाने ठरवून उपयोगी नाही कारण त्यात त्याचा स्वार्थ डोकावू शकतो म्हणून त्याने स्वत:च्या मनाने कोणते कर्म करायचे हे न ठरवता नीतीन्यायाचा आधार घेऊन यथायोग्य कर्म करणे आवश्यक आहे.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, कोणते कर्म करणे योग्य आहे आणि कोणते कर्म करणे अयोग्य आहे हे ठरवताना अगदी शहाणा मनुष्यसुद्धा गोंधळून जातो. तसे होऊ नये म्हणून त्याबद्दल मी तुला सविस्तर सांगतो. ते जाणून तू मुक्त होशील.
नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे । तुज ते सांगतो कर्म जाणूनि सुटशील जे ।। 16 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, प्रत्येकाला जन्माला आल्यावर कर्म तर करावेच लागते आणि त्यात कोणतीही टाळाटाळ करणे अनुचित आहे. हे माहीत असलेले शहाणे लोकही नक्की काय केले की, आपण कर्मबंधनात अडकणार नाही हे ठरवताना गोंधळून जाताना दिसतात कारण ते चुकीच्या दिशेने विचार करत असतात. कसे ते तुला सविस्तर सांगतो. शहाण्या माणसांना खऱ्या आणि खोट्या नाण्यातील फरक चांगला माहीत असतो. तरीही ते काहीवेळा गोंधळतात मग कर्म आणि अकर्म ह्यात फरक करताना सामान्य मनुष्य गोंधळून गेला तर त्यात नवल नाही कारण कर्म आणि अकर्म ह्यातील सीमारेषा अगदी पुसट असते.
क्रमश: