बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी हानिकारक
मंत्री दिनेश गुंडूराव : असुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार : लवकरच आदेश जारी शक्य
बेंगळूर : बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर) आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिला आहे. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या बाटलीबंद पाण्याची प्रयोगशाळांमध्ये तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात आरोग्यासाठी धोकादायक अंश आढळून आल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. राज्यभरातून 228 बाटलीबंद पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यापैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक नमुने निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहेत. बेंगळूरमध्ये मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले, राज्याच्या आहार गुणवत्ता विभागाने अनेक बाटलीबंद पाण्यासह अनेक खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेकडे पाठविले होते.
त्यांची तपासणी केल्यानंतर बंद बाटलीतील खनिजयुक्त पाणी सुरक्षित नसल्याचे आढळले आहे. देशभरातील व राज्यभरातील 296 कंपन्यांमधील बाटलीबंद पाण्याची तपासणी करण्यात आली असता केवळ 72 कंपन्यांचे उत्पादन सुरक्षित असल्याचे आढळले आहे. अनेक बाटल्यांमधील पाण्यात रसायने आणि बॅक्टेरिया आढळले आहे. या कंपन्यांचे नमुने पुन्हा गोळा करून टाळे ठोकले जातील. केवळ स्थानिक पातळीवरीलच नव्हे; तर राष्ट्रीय स्तरावर विक्री होणाऱ्या कंपन्यांचे पाणी असुरक्षित आढळून आले आहे. या कंपन्या कोणकोणत्या हे लवकरच उघड करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी म्हटले आहे. बाटलीबंद पाण्यामध्ये मिनरल्स नसतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने पाणीविक्री करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खव्यामध्येही आढळली भेसळ
गोड पदार्थ, मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या खव्यामध्येही भेसळ आढळून आली आहे. ही भेसळ आरोग्यासाठी धोकादायक आहे. दक्षिण कर्नाटक भागात तुरीमध्ये केशरी रंगाचा वापर होत असल्याचे आढळले आहे. याचे सेवन केल्यास घातक आजार होऊ शकतात. केशरी रंगमिश्रीत डाळीचे सेवन केल्यास अर्धांगवायू, अपंगत्व आणि कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
हिरव्या वाटाण्यांवर बंदी येणार
हिरव्या रंगाचे (कृत्रिम रंगाचा वापरून प्रक्रिया केलेले) वाटाणे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करत असल्याने त्यावर बंदी घातली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अन्न सुरक्षा विभागाने यापूर्वीही हिरव्या वाटाण्यांसंबंधी माहिती दिली होती. रासायनिक रंगांचा वापर करून प्रक्रिया केले जाणाऱ्या वाटाण्याच्या विक्रीवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे.
मध, तुपातही रसायनांचा वापर
काही कंपन्यांकडून मध व तुपातही रसायनांचा वापर होत आहे. कागदी कप वापरल्याने कर्करोग संभव आहे. या कपमधून गरम कॉफी, चहा प्राशन केल्यास आतील प्लास्टिकचे आवरण वितळून माणसाच्या शरीरात मिसळले जाऊ शकते, असेही मंत्री गुंडूराव यांनी म्हटले आहे.