For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड डॅमचे दोन्ही कालव्यांचे दरवाजे नादुरुस्त

10:22 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगड डॅमचे दोन्ही कालव्यांचे दरवाजे नादुरुस्त
Advertisement

पावसाळा सुरू होण्यापूर्वी डॅमची दुरुस्ती होणे गरजेचे

Advertisement

खानापूर : नंदगड गावाजवळ असलेल्या डॅमच्या उजव्या व डाव्या कालव्याचे दरवाजे पूर्णपणे नादुरस्त झाले असून दरवाजे ऑपरेट करण्यासाठी बांधण्यात आलेले स्लॅब कोसळलेले आहे. त्यामुळे पाण्याची गळती होऊन पाणी जात असल्याने डॅममध्ये पूर्ण क्षमतेने पाण्याची साठवणूक होत नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. दोन्ही कालव्यांच्या दरवाज्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात डॅममध्ये पाणी साठवणूक योग्य क्षमतेने होणार नाही. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने पावसाळ्यापूर्वी दोन्ही कालव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.  नंदगड परिसरातील दुर्गादेवी डोंगराच्या खाली नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी शेतीसाठी तत्कालीन आमदार बसाप्पण्णा अरगांवी यांनी हा डॅम उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नातून हा डॅम तयार झाला होता. या डॅमच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी उजवा, डावा दोन कालवे करण्यात आले होते. दोन्ही कालव्यांद्वारे चार कि. मी. परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे कसबा नंदगड, चन्नेवाडी, सागरे, नजिनकोंडल, भुत्तेवाडी आदी परिसरातील 1500 एकर शेतीसाठी उपयुक्त आहे. मात्र अलीकडे दोन्ही कालव्यांचे दरवाजे पूर्णपणे निकामी झाले असून एका उजव्या कालव्याचा दरवाजा ऑपरेटींगसाठी तयार केलेली सीडी कोसळली असून त्यामुळे कालव्याच्या ऑपरेटींगसाठी जाता येत नाही. दोन्ही कालव्यांचे दरवाजे पूर्णपणे निकामी झाले आहेत.

त्यामुळे या डॅममधून पाण्याची कायम गळती होत असते.  गेल्यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने डॅममध्ये पाण्याचा साठा कमी झाला होता. त्यातच दरवाज्याची दुरुस्ती न झाल्याने या दोन्ही कालव्यांतून पाण्याची गळती झाल्याने धरणातील पाणीसाठा पूर्णपणे संपला असून धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पीक वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन्ही कालव्याच्या दरवाज्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी दोन्ही दरवाज्यांची दुरुस्ती करून योग्यप्रकारे ऑपरेंटींग करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा नव्याने बसविणे गरजेचे आहे. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने पावसाळ्यापूर्वी दोन्ही कालव्यांची दुरस्ती केल्यास डॅममध्ये पाणीसाठा पूर्णक्षमतेने होणार आहे. त्यामुळे पुढीलवर्षी उन्हाळी पिकांना लाभदायक ठरणार आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वी कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होंत आहे. डॅमची उभारणी पन्नासच्या दशकात झाली होती. त्यामुळे या डॅममध्ये गाळाची साठवणूक मोठ्याप्रमाणात झाली आहे. त्यामुळे डॅमची खोलीही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यासाठी डॅमची खोली वाढवण्यासाठी गाळ काढणे गरजेचे आहे. ग्राम पंचायतीने रोजगार हमी योजनेतून या डॅमची खोली वाढवण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मात्र याबाबत ग्रा. पं. कडून कोणताही क्रम घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

मंजुरी दिल्यास कालव्यांची दुरुस्ती करू!- लघुपाटबंधारे विभाग

याबाबत लघुपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच सीडीच्या कामासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. जर शासनाने प्रस्तावास मंजुरी दिल्यास दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, तसेच गाळ काढण्यासंदर्भात ग्रा. पं. ने ठराव करून आम्हास पत्र दिल्यास ताबडतोब परवानगी देण्यात येईल, मात्र ग्राम पंचायतीने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.