बेंगळूर-बेळगाव मार्गावरील दोन्ही जादा एक्स्प्रेस फुल्ल
अजूनही प्रवासी वेटिंगवर, तिसऱ्या एक्स्प्रेसची मागणी
बेळगाव : गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव मार्गावर दोन विशेष रेल्वेफेऱ्या जाहीर केल्या आणि अल्पावधीतच या रेल्वेफेरीला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दोन्ही रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले असून आता अजून एक जादाची एक्स्प्रेस गणेशोत्सवाला सोडण्याची मागणी केली जात आहे. बेळगावमधील अनेक नागरिक व्यापार, व्यवसाय, नोकरीनिमित्त बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर, त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक या परिसरात वास्तव्यास आहेत. गणेशोत्सवाच्या काळात हे सर्व नागरिक आपापल्या गावी परतत असतात.
वाहतुकीच्या इतर पर्यायांपैकी रेल्वेचा पर्याय हा सुरक्षित आणि किफायतशीर असल्याने प्रवाशांची पहिली मागणी रेल्वेला असते. सध्या बेळगाव-बेंगळूर मार्गावर दररोज दोन एक्स्प्रेस धावतात. त्याचबरोबर साप्ताहिक एक्स्प्रेसही या मार्गावर धावत असतात. तरीदेखील प्रवाशांची मागणी असल्याने खास गणेशोत्सवासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने दि. 5 व 6 रोजी जादा एक्स्प्रेस सोडण्याची घोषणा केली होती. घोषणा केलेल्या केवळ एक ते दोनच दिवसात रेल्वेचे बुकिंग वेटिंगपर्यंत पोहोचले. सध्या स्लीपर, 3ए व 2ए या डब्यांचे बुकिंगही जवळपास फुल्ल होत आले आहे. यामुळे प्रवाशांना तत्काळ बुकिंगवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे या काळात आणखी एखादी एक्स्प्रेस सोडल्यास प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे.
मुंबई-पुण्याच्या प्रवाशांकडे दुर्लक्षच
गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांमध्ये मुंबई-पुण्यातील प्रवाशांचा अधिक भरणा आहे. परंतु, मध्य रेल्वे आणि नैर्त्रुत्य रेल्वे यांच्यामध्ये समन्वय नसल्याने नैर्त्रुत्य रेल्वे जादा एक्स्प्रेस सोडण्यास तयारी दाखवत नाही. तर मध्य रेल्वे बेळगावपर्यंत एक्स्प्रेस सोडण्यास इच्छुक नाही. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. हुबळी, तसेच चालुक्य एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग फुल्ल झाल्याने प्रवाशांना जादा खर्च करून खासगी वाहने बुकिंग करावी लागत आहेत.