हातपायाशिवाय जन्म तरीही स्वीमिंग पेंटिंग
जीवनात सुख-दु:ख येतच असतात. कधीकधी माणसांसमोर अत्यंत मोठे आव्हान उभे ठाकल्यावर त्याचे हातपाय गळून जातात. परंतु काही लोक कधीच हिंमत हरत नाहीत. अनेक अडचणींवर मात करत ते जीवनात नवा पल्ला गाठत असतात. असाच एक व्यक्ती हातापायाशिवाय जन्माला आला, परंतु त्याने केलेली कामगिरी इतरांसाठी उदाहरण ठरली आहे.
ही कहाणी ऑस्ट्रेलियातील 42 वर्षीय निक वुजिसिसची असून तो मोटिव्हेशनल स्पीकर आहे. निक एक दुर्लभ जन्मजात विकार टेट्रा-अमेलिया सिंड्रोमने पीडित आहे, परंतु तो एक अॅथलीट देखील आहे. तो हातापायांशिवाय जन्माला आला होता. त्याच्या डाव्या बाजूला एक छोटा पाय आहे, ज्याचा वापर तो प्रत्येक काम अन् अॅडव्हेंचरमध्ये करत असतो.
निक वुजिसिसच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही जीवनात निराश होणेच सोडून द्याल. निक वुजिसिस यशस्वी प्रेरक वक्ता आहे. डॉक्टरांना देखील त्याचा विकार दूर करण्यास यश आले नव्हते. जन्मापासूनच हातापायाशिवाय जगणे त्याच्यासाठी आव्हानात्मक राहिले होते. मी इतरांपासून वेगळा का आहे, माझ्या जीवनाचा कुठला उद्देश आहे की नाही, असे अनेक प्रश्न त्याला सतावत होते. परंतु त्याने कधीच स्वत:च्या जीवनात हार मानली नाही आणि नेहमी इतर लोकांप्रमाणे जीवन जगत राहण्याचा प्रयत्न केला. वयाच्या 19 व्या वर्षी त्याने पहिले भाषण केले होते. आतापर्यंत निकने अनेक देशांचा दौरा केला असून प्रेरणादायी भाषणाद्वारे तो लोकांना प्रेरित करत असतो. जगभरात कोट्यावधी लोक त्याला पाहुन प्रेरित होतात. 2007 मध्ये निकने ऑस्ट्रेलिया ते दक्षिण पॅढलिफोर्निया पर्यंतचा दीर्घ प्रवास केला, जेथे तो इंटरनॅशनल नॉन-प्रॉफिट मिनिस्ट्री लाइफ विथआउट लिम्बसचा अध्यक्ष झाला. स्वत:च्या या शौर्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियन यंग सिटीजन पुरस्कारही पटकाविला. निक आता एक लेखक, संगीतकार, कलाकार आहे. तसेच तो फिशिंग, पेंटिंग आणि स्वीमिंग देखील करतो. सामान्य लोकांप्रमाणेच तो गोल्फ अन् फुटबॉल खेळतो. परंतु याहून अधिक प्रभावित करणारी बाब म्हणजे जीवनाबद्दलचा त्याचा दृष्टीकोन आणि आनंदी जीवन जगण्याची पद्धत आहे. सध्या तो जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या लेखकांपैकी एक आहे. निकने वयाच्या 10 व्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु एका पत्राने त्याचे जीवन बदलून गेले. हे पत्र स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. यात दिव्यांगत्वाला पराभूत करण्याऱ्या मुलांची कहाणी होती. निकने आपण एकटे नसल्याची धारणा मनात तयार केली. माझ्याप्रमाणे अनेक लोक शारीरिक अक्षमतेला सामोरे जात आहेत आणि तरीही विजय मिळवित असल्याचा विचार त्याने मनात ठेवून वाटचाल केली आणि आता तो यशस्वी ठरला आहे.