बोरी पूल तब्बल 19 तास बंद
हजारो वाहनचालकांची गैरसोय झाल्याने संताप : फेरीबोटींची संख्या वाढवण्याकडे सरकारचे दुर्लक्ष, लहान फेरीबोटींमुळे राशोल, रासई धक्क्यांवर तणाव
मडगाव : बोरी पुलाच्या दुरूस्ती कामासाठी पूल शनिवार दि. 25 रोजी रात्री 8 ते रविवार दि. 26 रोजी सकाळी 8 पर्यंत बारा तास बंद ठेवला जाणार होता. तशी अधिकृत सूचना जारी करण्यात आली होती. मात्र, शनिवारी रात्री व रविवारी सकाळपर्यंत जोरदार पावसामुळे दुरूस्तीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य न झाल्याने पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. परिणामी रविवारी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावे लागले. रविवारी दुपारी 2.45 वाजता पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुमारे 19 तास पूल वाहतुकीसाठी बंद राहिल्याने वाहनचालकांना राशोल व रासई फेरीबोटीवर अवलंबून रहावे लागले.
फेरीबोटींची संख्या वाढवण्याकडे सरकारचे दुर्लक्ष
दोन्ही ठिकाणी केवळ दोन-दोन फेरीबोटी होत्या. त्या कमी पडल्याने त्यांची संख्या वाढवण्याची गरज होती. या अगोदरच्या शनिवारीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. फेरीबोटी कमी असल्यामुळे कसा त्रास होतो, याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करुन सरकारच्या नजरेस आणून दिले होते. तरीही संबंधित खात्यांनी दखल न घेतल्याने या शनिवारीही पुन्हा तोच गोंधळ झाल्याने सर्वांनाच त्रास सहन करावे लागले. त्याचबरोबर ज्या फेरीबोटी कार्यरत होत्या, त्या लहान असल्याने एका खेपेस केवळ दोन किंवा तीनच गाड्या सामावत असल्याने बरीच गैरसोय होत होती.
फेरीबोटी लहान असल्याने मोठी गैरसोय
एक तर आवश्यकता ओळखून फेरीबोटींची संख्या सरकारने वाढविली नाही. शिवाय ज्या फेरीबोटी कार्यरत होत्या त्या लहान होत्या. त्यामुळे एका फेरीबोटीत केवळ दोन-तीन गाड्याच सामावून घेतल्या जात होत्या. त्यामुळे वाहनचालकांना फोंडा व मडगाव गाठण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागले. दोन्ही फेरीबोटीच्या धक्क्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पोलिस, वाहनचालक, कंत्राटारामध्ये उडाले खटके
रविवारी सकाळी 8 नंतर पूल बंद ठेवला जाणार याची कोणतीच पूर्व कल्पना दिली गेली नव्हती. त्यामुळे पुलावर ड्युटी बजावणारे पोलिस व वाहनचालक यांच्यात बरेच खटके उडाले. त्यात पुलाच्या दुरूस्तीकाम करणारा कंत्राटदारही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची कैफियत पोलिसांनी मांडली.
पावसामुळे झाला विलंब
शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने पुलाची ‘बेअरिंग्ज’ बदलण्याच्या कामाला प्रचंड विलंब झाला. रात्रभर पाऊस तसेच पुन्हा रविवारी सकाळी पाऊस कायम राहिल्याने बेअरिंग्ज बदलण्याचे काम लांबले. एकदा हाती घेतलेले काम अर्ध्यावर बंद ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. तसेच पुलाच्या मध्यमागी वाहतुकीसाठी जी लोखंडी कमान उभारण्यात आली होती, ती लोटलीच्या बाजूने हलविण्यात आल्याने त्यामुळेही विलंब झाला. ही लोखंडी कमान आता शनिवार दि. 1 रोजी हटवण्यात येणार आहे. त्यादिवशी रात्री 8 ते पहाटे 4 वाजेपर्यंत आठ तास पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे.
राशोल, रासई फेरीबोटींवर ताण
काल रविवारी सकाळी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने फोंडाहून मडगावकडे व मडगावहून फोंड्याकडे येणाऱ्या वाहन चालकांची प्रचंड गैरसोय झाली. अनेकांनी राशोल फेरीबोटीतून शिरोडामार्गे फोंड्यात येणे पसंत केले तर रासई फेरीबोटीतून आगापूर-दुर्भाट मार्गे फोंड्याकडे व मडगावकडे जाण्या-येण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे कमी फेरीबोटी व लहान फेरीबोटी असल्याने दोन्ही फेरीबोटीच्या धक्क्यांवर वाहनाच्या दोन्ही बाजूने लांब रांगा लागल्या होत्या. दोन्ही फेरीबोट मार्गावर केवळ दोन-दोनच फेरी उलपब्ध असल्याने तसेच फेरीत केवळ दोन-तीन वाहनेच सामावून घेतली जात असल्याने लोकांना निर्धारित वेळेत आपल्या घरी पोचण्यास तसेच कामावर पोचण्यास विलंब झाला. या दोन्ही फेरीमार्गावर अतिरिक्त फेरीबोटी उपलब्ध केल्या असत्या तर लोकांना देखील मानसिक त्रास झाला नसता अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.