बोरगांव पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल केले परत
देशमुखनगर :
बोरगाव पोलिसांनी हद्दीतील नागरिकांचे ४,८२,५०० रु. किंमतीचे ३३ मोबाईल गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मूळ मालकांना परत केले आहेत. बोरगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाईल गहाळचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांना नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोध घेणेकामी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस व पोलीस अंमलदार यांना नागरिकांचे हरविलेले मोबाईलचा शोध घेणेकामी मार्गदर्शन करुन सूचना केल्या.
त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार यांनी सीईआयआर पोर्टलवर इतर तांत्रिक माहिती प्राप्त करुन महाराष्ट्रातील व परराज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहीम राबविल्याने बोरगांव पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले एकूण ४,८२,५०० रु किंमतीचे ३३ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.
सदरची मोहीम पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे बोरगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी सांगितले आहे. तरी आजपर्यंत गहाळ झालेल्या मोबाईलपैकी ८६ मोबाईल नागरिकांना परत देण्यात बोरगांव पोलिसांना यश आले आहे.
अशाप्रकारे बोरगांव गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक माहिती प्राप्त करुन महाराष्ट्रातून व परराज्यातून नागरिकांचे गहाळ झालेले एकूण ४,८२,५०० रु. किंमतीचे ३३ मोबाईल हस्तगत करून ते राजीव नवले यांच्या हस्ते मूळ मालकांना परत केले आहेत.