चिंबल येथील बोअरवेल्स सील
कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई : तणावपूर्ण वातावरणात मोहीम
पणजी : चिंबल येथील धारवडकर कॉलनी परिसरात अनधिकृत बोअरवेल सील करण्यासाठी गेलेल्या जलस्रोत विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाला स्थानिक रहिवाशांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने जुने गोवे पोलिसस्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तणावपूर्ण वातावरणात ही मोहीम राबवण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने चिंबल येथील सुमारे 70 अनधिकृत बोअरवेल सील करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी सकाळी सरकारी यंत्रणा चिंबलमध्ये पोहोचली. मात्र, कारवाईला सुरुवात होताच शेकडो स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल़ा. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जुने गोवे पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. काही रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर काही बोअरवेल सील करण्याची प्रक्रिया पूर्ण केल़ी. या घटनेनंतर चिंबल परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून स्थानिक आमदारांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
बेकायदेशीर बोअरवेल्स सील करणार : मंत्री शिरोडकर
तिसवाडी : गोव्यातील चिंबल परिसरात करण्यात आलेल्या बोअरवेल सीलिंगच्या कारवाईनंतर राज्यभरातील बेकायदेशीर पाण्याच्या उपशावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी कठोर भूमिका घेत राज्यातील सर्व बेकायदेशीर बोअरवेल्स सील करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. मंत्री शिरोडकर म्हणाले की, राज्यात अनधिकृतपणे चालणाऱ्या बोअरवेल्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाण्याच्या स्रोतांचा बेकायदेशीर वापर सहन केला जाणार नाही. चिंबलमधील धारवाडकर कॉलनी येथे आतापर्यंत 22 बोअरवेल्स सील करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यभरात अशा बोअरवेल्सचा शोध घेण्याचे काम सुरू असून, लवकरच व्यापक स्तरावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.