For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुतात्मादिनी सीमावासियांची कोल्हापूरला धडक

12:03 PM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
हुतात्मादिनी सीमावासियांची कोल्हापूरला धडक
Advertisement

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न, मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र सरकारचे सीमावासियांकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. यामुळे सीमाप्रश्नाची धार कमी होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला. महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी शुक्रवार दि. 17 रोजी हुतात्मा दिनी कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीमध्ये हुतात्मा दिन, दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यासह विविध विषयांवर चर्चा झाली. 17 जानेवारी रोजी बेळगावमध्ये हुतात्मा दिन पाळण्यात येतो. सकाळी बेळगावमध्ये हुतात्म्यांना अभिवादन करून दुपारी 3 वाजता कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

त्यानंतर बिंदू चौक येथे सकल मराठा समाजाच्यावतीने होणाऱ्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने सीमावासीय उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली. 17 रोजी सकाळी 11 वाजता काकतीजवळील बर्डे धाब्यानजीक आपापल्या वाहनांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. तेथून सर्वजण एकत्रितरित्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, अॅड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील, आबासाहेब दळवी, बिर्जे, पियुष हावळ यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisement

संमेलनांच्या अध्यक्षांना पत्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा ठराव मांडला जावा यासाठी मध्यवर्तीने एक पत्र अध्यक्ष मिलिंद जोशी यांना पाठविले आहे. त्याचबरोबर संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांची शुक्रवारी सांगली येथे भेट घेऊन सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्याबाबत विनंती केली जाणार आहे. म. ए. समितीच्या ज्या सदस्यांना दिल्ली येथील संमेलनाला उपस्थित राहायचे आहे, त्यांनी संमेलनाला उपस्थित राहून सीमावासियांचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

हुतात्मा स्मारकाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचे बांधकाम करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून लवकरच हुतात्मा स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी म. ए. समितीची बैठक बोलाविली जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर शिवसेनेच्यावतीने भरविण्यात येणारी सीमा परिषद व चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या मेळाव्याला पाठिंबा जाहीर करण्यात आला.

Advertisement
Tags :

.