सीमावासीयांचे धरणे आंदोलन
कोल्हापूर :
सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला गती देण्याच्या मागणीसाठी सीमाभागातील मराठी बांधवांनी शुक्रवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानंतर खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.
रहेंगे तो महाराष्ट्र मैं, नही तो जेल मे, बेळगांव, कारवार, निपान्नी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगांव आमच्या हक्काचं.., एकच भाषा मराठी भाषा, सुटलाच पाहिजे, सुटलाच पहिजे, सीमा प्रश्न सुटलाच पाहिजे अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
सीमालढ्यात हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांना सीमाभागात अभिवादन करुन शेकडो सीमाबांधव शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सीमाबांधवांनी त्यांच्या तीव्र भावना कोल्हापूरवासियांसमोर मांडल्या. सीमावासियांच्या धरणे आंदोलनात सहभागी होत कोल्हापूरातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी सीमावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी कोल्हापूर नेहमीच सीमाबांधवांच्या खांद्याला खांदा लावून सोबत असेल असे आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र सीमेवरील 865 गावातील सुमारे 25 ते 30 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी गेली 68 वर्षे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. सीमाप्रश्नी पुढील नियोजनासाठी तत्काळ उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करुन बैठकीसाठी मध्यवर्ती समितीच्या पदधिकाऱ्यांना निमंत्रीत करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, बेळगांवचे माजी महापौर मालोजी आष्टेकर, रमाकांत कोंडूसकर, अंकुश केसरकर, रवींद्र साळुंखे, आर. एम. चौगुले, आर.के.पाटील, सुरेश राजूरकर, बी.एस. पाटील, डी. बी. पाटील, आनंद आष्टेकर, श्रीकांत कदम, आनंदा रणदिवे, हिंदूराव मोरे यांच्यासह कोल्हापुरमधुन आमदार जयंत असगांवकर, माजी आमदार के. पी. पाटील, शिवसेना ठाकरे गट सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, कॉ. दिलीप पोवार, जनसुराज्यचे समीर कदम, अॅङ तौफीक मुल्लाणी, हर्षल सुर्वे, शेकापचे सुभाष चव्हाण आदी उपसिथत होते.