For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अन्यायाविरोधात आज सीमावासियांचा काळादिन

07:18 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अन्यायाविरोधात आज सीमावासियांचा काळादिन
Advertisement

निषेध फेरीतून दाखवणार एकी, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

तत्कालिन केंद्र सरकारच्या एका चुकीमुळे बेळगावसह संपूर्ण सीमाभाग मागील 70 वर्षांपासून नरकयातना सहन करत आहे. देशातील हा एकमेव लढा असेल जो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत तितक्याच नेटाने लढला जात आहे. कोणत्याही पक्षाच्या, व्यक्तीच्या किंवा शक्तीच्या पाठिंब्याविना मराठी भाषिकांच्या जीवावर सीमाप्रश्नाचा लढा उभा आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दरवर्षी 1 नोव्हेंबर हा काळादिन पाळला जातो.

Advertisement

मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात भव्य निषेध फेरी काढली जाते. यावर्षी रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी ही निषेध फेरी काढली जाणार असून यामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता संभाजी उद्यान येथून फेरी काढली जाणार असून त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाषावार प्रांतरचनेनंतर प्रत्येक भाषेला स्वतंत्र राज्य मिळाले. परंतु बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठीबहुल भागाला तत्कालिन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आले. 1956 पासून या भागातील मराठी भाषिक आपल्या भाषेच्या राज्यामध्ये जाण्यासाठी लढा देत आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. बेळगावच्या साहित्य संमेलनातून संयुक्त महाराष्ट्राची पहिली हाक प्र. के. अत्रे यांनी दिली आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक हुतात्मे झाले. अनेकांनी आपल्या प्राणांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या बेळगावमधून संयुक्त महाराष्ट्राची हाक देण्यात आली, ते बेळगाव मात्र कर्नाटकात खितपत पडले. वाढत्या कानडी अत्याचारांनी येथील मराठी भाषिकांची सुटका करण्यासाठी न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरचा लढाही सुरू आहे.

कडकडीत हरताळ पाळून सहभागी व्हा!

सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात मागील 70 वर्षांपासून लोकशाहीमार्गाने लढा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा सुरू असला तरी रस्त्यावरचा लढाही तितकाच तत्परतेने लढणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी कडकडीत हरताळ पाळून निषेध फेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीसह इतर मराठी भाषिक संघटनांनी केले आहे. काळे कपडे, महिलांनी काळ्या साड्या, काळ्या टोप्या, दंडाला काळी फित बांधून अन्यायाला वाचा फोडली जाणार आहे.

प्रशासनाला ताकद दाखवणारच!

जिल्हा प्रशासनाकडून काळ्यादिनाच्या फेरीबाबत केवळ 300 जण फेरीत सहभागी होतात, असे सांगण्यात आले होते. परंतु यावर्षी 30 हजारहून अधिक मराठी भाषिकांनी सहभागी होऊन एकी दाखवून द्यायची आहे. जिल्हा प्रशासनासह राज्य व केंद्र सरकारलाही दखल घ्यावी लागेल, अशा निषेध फेरीचा निर्धार करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी उद्यानातून फेरीला प्रारंभ होणार आहे.

Advertisement
Tags :

.