सीमेवरील घुसखोरी वेळीच रोखावी!
फ्लॅग मिटिंगमध्ये भारताचा पाकिस्तानला इशारा : सीमापार दहशतवाद थांबवण्याचाही सल्ला
चर्चा...
- पाकिस्तानच्या विनंतीवरून दोन्ही देशांमध्ये फ्लॅग मिटिंग
- पूंछ सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान सैन्याधिकाऱ्यांची बैठक
- पाकिस्तानचे लष्करी अधिकारी बैठकीसाठी काश्मीरमध्ये
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय लष्करी अधिकारी आणि पाकिस्तानी सैन्याधिकारी यांच्यात गुरुवार, 10 एप्रिल 2025 रोजी पूंछ सेक्टरमध्ये ध्वज बैठक (फ्लॅग मिटिंग) झाली. दोन्ही देशांमधील सीमा व्यवस्थापन प्रक्रियेचा भाग म्हणून नियंत्रण रेषेवर (एलओसी) नियमित संवादाचा हा एक भाग होता. या बैठकीत प्रामुख्याने दोन्ही देशांमधील तणाव आणि सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांवर चर्चा झाली. सीमेपलिकडून होणारी घुसखोरी पाकिस्तानने वेळीच रोखावी असा इशारा याप्रसंगी भारताकडून देण्यात आला.
जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील सीमेवरील तणावाबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्तानला स्पष्ट इशारा देताना सीमापार दहशतवाद थांबवा अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे स्पष्ट केले. अलिकडच्या काळात पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानकडून सतत युद्धबंदीचे उल्लंघन केले जात आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही पाकिस्तानचे सैन्य जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी होत नसल्यामुळे ते हताश होऊन दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भारताच्यावतीने करण्यात आला.
नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान पूंछ सेक्टरमधील चाकण दा बाग भागात ध्वज बैठक घेण्यात आली. पाकिस्तानच्या वारंवारच्या विनंतीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सीमा समस्या तसेच अलिकडच्या काळात झालेल्या युद्धबंदी उल्लंघनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या बैठकीतील चर्चा पाकिस्तानी सैन्याने अलिकडेच केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांभोवती फिरत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत आणि पाकिस्तानमधील वाढते शत्रुत्व कमी करण्यासाठी ही ध्वज बैठक एक नवीन उपक्रम म्हणूनही मानली जात आहे. दोन्ही देशांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये युद्धबंदीचा समझोता कायम ठेवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
आयईडीच्या वापरावर भारत आक्रमक
भारतीय हद्दीत सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) बसवण्याचा आणि पाळत ठेवणारे कॅमेरे बसवण्यावरही बैठकीत चर्चा झाली. यापूर्वी अशा बऱ्याच कारवाया भारतीय सैन्याच्या घुसखोरीविरोधी यंत्रणेने प्रभावीपणे हाणून पाडल्या आहेत. भारताने या आक्रमक कृत्यांना तीव्र आक्षेप घेत नियंत्रण रेषेवरील शांततेसाठी हा एक मोठा धोका असल्याचे म्हटले.
घुसखोरी आणि तस्करीबद्दल चिंता
या बैठकीत भारताने पाकिस्तानकडून विनाकारण होणाऱ्या गोळीबाराच्या घटना, दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न आणि ड्रग्ज व शस्त्रास्त्र तस्करीबद्दल चिंता व्यक्त केली. अशा कारवाया सीमेवरील शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका निर्माण करत असून त्याचा दोन्ही बाजूंनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे सांगत भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला ठणकावले.
युद्धबंदी कराराचे महत्त्व
बैठकीदरम्यान सीमेवर शांतता राखण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला. दोन्ही देशांनी 2021 मध्ये झालेल्या युद्धबंदी कराराचे पालन करण्याचा संकल्प केला. दोन्ही देशांमधील परस्पर समंजसपणा आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. भारत आणि पाकिस्तानमधील शांतता आणि सहकार्याला चालना देण्यासाठी ही ध्वज बैठक एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. या माध्यमातून सीमेवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन
6 एप्रिल रोजीच जम्मू काश्मीरमधील पूंछ जिह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार झाला. या हल्ल्यात एक लष्करी जवान हुतात्मा झाला. सीमेपलीकडून पुंछमधील शाहपूर आणि केर्नी भागात गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यापूर्वीही गेल्या दोन-तीन महिन्यात असे प्रकार निदर्शनास आलेले आहेत.