Kolhapur Haddawad: हद्दवाढीची प्रक्रिया सुरु करा, 8 गावांना प्रस्ताव देण्याच्या सूचना
शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे काळाची गरज आहे
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत शहरालगतच्या आठ गावांचा समावेश असलेला नूतन प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करा. शहराची हद्दवाढ करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये केल्या.
शहराच्या हद्दवाढीसंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना समन्वयक सत्यजित कदम यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी बैठकीमध्ये हद्दवाढीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. क्षीरसागर म्हणाले, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील जनता आमची शत्रू नाही. त्यामुळे हद्दवाढीसंदर्भात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. हद्दवाढ विरोधी समितीने हद्दवाढीची गरज ओळखावी.
शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची असल्याने मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीची प्रक्रिया सुरु करण्याची सूचना केली. बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव उपस्थित असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रस्ताव देण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार हद्दवाढीचा प्रस्ताव देण्याबाबत कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना पत्र देणार आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करुन संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस काढतील. त्यानुसार संबंधित गावांची भूमिका आल्यानंतर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
बालिंगा, पाडळीचे गावठाण हद्दवाढीत नाही
हद्दवाढीच्या नूतन आठ गावांच्या प्रस्तावामध्ये करवीर तालुक्यातील बालिंगा, पाडळी गावाचा समावेश असला तरी या गावांच्या मूळ गावठाणचा हद्दवाढीत समावेश होणार नाही. मूळ गावठाणची हद्द सोडून शहरालगत असलेल्या या गावांच्या हद्दीमध्ये नागरिकरण झालेल्या भागाचा हद्दवाढीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधींना विचारात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय : आमदार चंद्रदीप नरके
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांनी हद्दवाढीसंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माझ्यासह आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने उपस्थित नव्हते. त्यामुळे या चर्चेतून हद्दवाढीबाबत निर्णय झाला असे म्हणता येणार नाही.
ज्या विधानसभा मतदारसंघातील गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश होणार आहे तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. हद्दवाढीला ग्रामीण भागातील जनतेचा विरोध आहे. त्यामुळे त्यांची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची लोकप्रतिनिधी म्हणून असेल. त्यानुसार कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आमचा विरोधच असणार असल्याचे आमदार नरके यांनी स्पष्ट केले.
हद्दवाढीविरोधात 20 गावांत कडकडीत बंद
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला हद्दवाढीमध्ये समावेश असलेल्या 20 गावांचा सुरुवातीपासूनच विरोध राहिला आहे. मंगळवारी हद्दवाढीबाबत मुंबईमध्ये बैठक होणार असल्याने हद्दवाढीच्या विरोधात 20 गावांनी कडकडीत बंद करत तीव्र विरोध केला. हद्दवाढीच्या विरोधात सर्व गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिले. तर नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनीही कडकडीत बंद पाळत हद्दवाढीला विरोध दर्शविला.
हद्दवाढीमध्ये या आठ गावांचा समावेश
हद्दवाढीच्या नूतन प्रस्तावामध्ये उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, बालिंगा, पाडळी आदी गावांचा समावेश असणार आहे.
हद्दवाढ दोन प्रकारे होण्याची शक्यता
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्याने शहराची हद्दवाढ दोन प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे हद्दवाढ प्रभागरचना पूर्ण होण्यापूर्वी तत्काळ होऊ शकते. तत्काळ हद्दवाढ झाली नाही तर सद्यस्थितीप्रमाणे महापालिका, जि. प. आणि पं. स. निवडणुका होतील. यानंतर हद्दवाढ करुन ज्या गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश होईल त्या गावांमध्ये पुन्हा नगरसेवक पदासाठी निवडणुका होतील.