बोपण्णा-सुत्जियाद मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत
पुरुष दुहेरीतही बोपण्णाची एब्डनसमवेत आगूकच
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताच्या रोहन बोपण्णाने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीमध्ये आगेकूच केली आहे. पुरुष दुहेरीत त्याने एब्डनसमवेत उपउपांत्यपूर्व तर मिश्र दुहेरीत इंडेनेशियाच्या अॅल्डिला सुत्जियादसमवेत उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरुष दुहेरीत बोपण्णा व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डन यांनी रॉबर्टो कार्बालेस बाएना व फेडेरिको कॉरिया या स्पेन-अर्जेन्टिना जोडीवर 6-2, 6-4 असा केवळ एका तासात पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. विजयी जोडीने पहिला सेट झटपट संपवत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पराभूत जोडीकडून थोडाफार प्रतिकार झाला. पण अनुभवी जोडीने हा सेटही जिंकत आगेकूच केली. बोपण्णा-एब्डन यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून त्यांची पुढील लढत अर्जेन्टिनाच्या आंद्रेस मोल्टेनी व मॅक्सिमो गोन्झालेझ यांच्याशी होईल.
मिश्र दुहेरीत बोपण्णा इंडोनेशियाच्या सुत्जियादसमवेत खेळत असून पहिल्या फेरीत या जोडीने नेदरलँड्स-जर्मनीच्या डेमी स्कूर्स-टिम पुट्झ यांच्यावर 98 मिनिटांच्या खेळात 7-6, 7-6 अशी मात केली. पहिला सेट त्यांनी 9-7 असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकमध्येच 7-5 अशी मात केली. दुसऱ्या फेरीत या आठव्या मानांकित जोडीने ऑस्ट्रेलियाचा जॉन पियर्स व झेकची कॅटरिना सिनियाकोव्हा यांचा कडवा प्रतिकार मोडून काढत 0-6, 7-6 (7-5), 10-7 अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. त्यांची पुढील लढत चौथ्या मानांकित मॅथ्यू एब्डन व बार्बोरा क्रॅसिकोव्हा यांच्याशी होईल.