‘आयटी’तील तेजीने शेअरबाजाराला बळ
सेन्सेक्स 123 तर निफ्टी 37 अंकांनी मजबूत
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात आयटीचे समभाग वधारल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. दरम्यान आशियातील बाजारांमध्ये झालेल्या वाढीमुळे ही कामगिरी करण्यात बाजाराला यश मिळाले आहे. सुरुवातीच्या काळात बाजार मर्यादित व्यवहार करत राहिला होता. परंतु आयटी क्षेत्रातील समभागांनी आपली भूमिका मजबूत ठेवल्याचा लाभ बाजाराला झाला आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 80 अंकांहून अधिकने वधारुन खुला झाला. मात्र दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 123.42 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.15 टक्क्यांसोबत 82,515.14 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37.15 अंकांच्या तेजीसोबत 25,141.40 वर स्थिरावला आहे.
भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा
भारत आणि अमेरिकेने आठवड्यात प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या प्रमुख पैलूंवर चर्चा केली. त्यात बाजारपेठ प्रवेश, डिजिटल व्यापार आणि शुल्क यासारख्या मुद्यांचा समावेश होता. दोन्ही देशांनी चर्चेची गती कायम ठेवण्यास आणि 2025 (सप्टेंबर-ऑक्टोबर) पर्यंत बहु-क्षेत्रीय, परस्पर फायदेशीर बीटीएचा प्रारंभिक हप्ता अंतिम करण्याच्या उद्दिष्टासह वाटाघाटी सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली.
जागतिक बाजारातले चित्र
आशियाई बाजारपेठेत बुधवारी तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार चर्चेवर आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी या बातमीचे वर्णन ‘उत्पादक’ असे केले. मंगळवारी लंडनमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमधील चर्चा दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी चर्चेतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. परंतु वाणिज्य सचिव लुटनिक आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांच्यात चर्चा सुरू राहण्याची अपेक्षा आहे, जी आवश्यक असल्यास बुधवारपर्यंत सुरू राहू शकते. दरम्यान, जपानचा निक्केई निर्देशांक 0.33 टक्क्यांनी वाढला. तर ब्रॉडर टॉपिक्स इंडेक्स 0.014 टक्क्यांनी वाढला. कोस्पी 0.56 टक्के आणि एएक्स200 0.36 टक्के वाढला.