पुस्तके जगाला तारु शकतात
हिंदी लेखिका अलका सरावगी यांचे प्रतिपादन : डी. डी. कोसंबी महोत्सवातील दुसरे विचारपुष्प
पणजी : समाजातील विषमता वाढत चालली असून असत्याला चालना मिळत आहे. ते रोखण्याची शक्ती लेखनात आहे. पुस्तकेच जगाला तारू शकतात. जनतेला जागृत करण्याचे काम लेखकांनी करावे, तसेच साहित्यात संस्कृती, भवितव्य घडविण्याची ताकद असून लेखकांनी ती गरज ओळखून कार्यशील व्हावे, असे आवाहन बंगालच्या प्रमुख हिंदी लेखिका अलका सरावगी यांनी केले. मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. त्यांचा जीवनावर परिणाम होतो. त्यातून सावरण्यासाठी लेखन, पुस्तके, कथा महत्वाच्या असून त्यांच्यामुळेच जीवनात जागृती होते, असा दावा अलका सरावगी यांनी केला आहे.
डी. डी. कोसंबी विचार महोत्सवातील व्याख्यानमालेत दुसरे पष्प गुंफताना त्या बोलत होत्या. पणजीतील कला अकादमीत रंगलेल्या या व्याख्यानात त्यांनी पुढे सांगितले की साहित्य म्हणा किंवा पुस्तके ही जीवनात महत्त्वाची आहेत. ती मानवी जीवनात बदल घडवून आणू शकतात. कथांचे जग तर वेगळेच आहे. त्या कथांचे सकारात्मक परिणाम होऊन वर्तनात बदल होऊ शकतो. साहित्यामधून खरी माहिती उपलब्ध होते. त्यातून सामाजिक भावना जागृत रहाते. एकमेकांना समजून घेण्याचे सामर्थ्य साहित्यात आहे. त्यामधून ग्रामीण भागातील चित्रणही दाखवता येते, असे सरावगी यांनी नमूद केले.
साहित्यात अनेक बदल
देशात सर्वत्र नागरिकरण तसेच व्यावसायिकरण वाढत असून त्याचा परिणाम साहित्यावरही दिसून येतो. साहित्य आता डिजिटल स्वरुपातही साकारता येते. साहित्यात अनेक बदल घडून येत आहेत. या सर्वांचे परिणाम म्हणून अनेक आव्हाने उभी ठाकत आहेत. गेल्या दोन शतकात अनेक बदल होत गेले. त्याचेही पडसाद साहित्यातून उमटतात. सर्वच क्षेत्रात अत्याधुनिकता वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
पुस्तकेच जगाला तारू शकतात
साहित्य, कथा यामध्ये एक शक्ती वास करते आणि तिचा जनतेवर चांगला पगडा बसतो. ती पुस्तकेच पुढे जाऊन जगाला तारू शकतात. लहान मुलांना कंटाळा येत असेल तर कथांची पुस्तके उपयोगी पडतील, असे निवेदन त्यांनी केले. सुमारे तासभराच्या व्याख्यानात सरावगी यांनी ‘अॅन्ड इट सेज सेव्ह मी फ्रॉम स्युईसाईड’ या विषयावर सुरेख विचार मांडले. हा विषय प्रथम वाढत्या आत्महत्येशी संबंधित आहे की काय ? असे वाटत होते. परंतु तो त्यांनी साहित्याशी जोडला. तरुण पिढीला चांगले विचार करण्यासाठी आखलेल्या या व्याख्यानमालेचे व त्यातील विविध विषयांचे सरावगी यांनी कौतुक केले. व्याख्यानात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलका सरावगी या बंगालच्या सुप्रसिद्ध लेखिका असून 2001 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभणाऱ्या त्या हिंदी भाषेतील तरुण लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तके हिंदीत प्रकाशित झाली असून ती लोकप्रिय ठरली आहेत. काही पुस्तके प्रादेशिक, स्थानिक भाषेत अनुवादित झाली आहेत.