सांगलीत २४, २५ रोजी ग्रंथोत्सव
सांगली :
साहित्य रसिकांना खासगी आणि शासकीय ग्रंथ, प्रकाशने खरेदी करण्याची संधी ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने दिली आहे. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस येथील कच्छी जैन भवन येथे ग्रंथोत्सव आणि साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा आणि ग्रंथप्रेमीना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी हा ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. सोमवार सकाळी दहा वा. उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी, लोकप्रतीनिधी व ग्रंथालय संचालक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सकाळी जिल्हयातील ३४३ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्टेशन चौकातून ग्रंथ दिंडी कच्छी जैन भवन येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी प्रा. अविनाश सप्रे हे साहित्य, ग्रंथालये आणि वाचनसंस्कृती या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी 'दिलखुलास गप्पा आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' ही प्रकट मुलाखत, त्यानंतर 'साहित्य, सोशल मिडिया आणि मुले' या विषयावर परिसंवाद आणि सायंकाळी 'माय मराठी अभिवाचन स्पर्धा', दुसऱ्या दिवशी पहिले सत्र 'महाचर्चा चला संकल्प करुया वाचनाचा...' या विषयावर चर्चासत्र, दुसरे सत्र 'हसत खेळत विज्ञान' हा प्रयोगशील संवाद कार्यक्रम, तिसरे सत्र 'काव्यधारा बदलती जीवनशैली टिपणाऱ्या कवितांची मैफल', त्यानंतर चौथे सत्र 'भारतीय संविधान आपले भविष्य' या विषयावर व्याख्यान इत्यादी भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. समारोप मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. डॉ. गौतमीपुत्र कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत. सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये नियमित वाचकांचा आणि माय मराठी अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. ग्रंथोत्सवांतर्गत सलग दोन दिवस शासकीय प्रकाशने, स्पर्धा परीक्षेचे ग्रंथस्टॉल आणि अन्य मान्यवर प्रकाशनांचे ग्रंथ प्रदर्शनासाठी व विक्रीकरिता उपलब्ध असणार आहेत.
शासकीय प्रकाशनांची पुस्तके, दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम, वाचनसंस्कृतीचा जयघोष करणारी ग्रंथदिंडी, शालेय विद्यार्थी व शिक्षक आणि जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालये यांचा सहभाग इत्यादी या ग्रंथोत्सवाची प्रमुख वैशिष्टये आहेत, ग्रंथ, साहित्यिक व वाचक यांच्या आनंददायी व ज्ञानवर्धक मेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रंथप्रेमी, वाचक व नागरिकांनी सहभागी होऊन या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमित सोनवणे यांनी केले आहे.