For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाडांचे संस्कार

06:24 AM Jul 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
हाडांचे संस्कार
Advertisement

अस्थिविसर्जन हा एक संस्कार आहे. दाह संस्कारानंतर अस्थी घरी आणू देत नाहीत. ती बाहेर झाडाला टांगून ठेवतात किंवा अस्थिकलश जमिनीत पुरून ठेवतात. हाडाची काडे करून जे घर उभारले, नातीगोती जोपासली ते सारे क्षणात संपून जाते आणि पोरकी हाडे विसर्जनाची वाट बघतात. हाडे माणसाच्या जीवनाचे टळटळीत वास्तव सामोरे आणतात.

Advertisement

श्री कृष्णाने कंस मामाचा वध केल्याने कंसाचा सासरा जरासंध क्रोधाने खवळून श्रीकृष्णावर चालून आला. कृष्णाने त्याला बळपूर्वक तोंड दिले. जरासंधाने मथुरेवर सतरा वेळा स्वारी केली आणि हार खाल्ली. अठराव्या स्वारीच्या वेळेस जरासंधाचे वाढलेले बळ बघून व मथुरावासी यांचे युद्धामुळे वारंवार होणारे हाल बघूनही कृष्णाने मथुरेची राजधानी तिथून उचलून नवी ‘द्वारकानगरी’ वसवली. जरासंधाला वाटले की श्रीकृष्ण भयाने पळून गेला, परंतु ते त्याचे अज्ञान होते. जरासंध प्रबळ होता. राजसूय यज्ञ करण्याअगोदर जरासंधाला जिंकण्यासाठी श्रीकृष्ण, अर्जुन, भीम अतिथीवेषात जरासंधाकडे गेले. अतिथी भक्त जरासंधाने विचारले, ‘तुम्हाला जेवायचे आहे का?’ तेव्हा भगवंत म्हणाले, ‘आम्ही जेवणासाठी आलेलो नाही; तर युद्धासाठी आलो आहोत’. त्यांनी स्वत:चा परिचय करून दिला. जरासंध मोठ्याने हसून म्हणाला, ‘कृष्णा, तू तर युद्धाला घाबरून पळून गेलास. अर्जुन हा लहान मुलगा आहे, परंतु भीम मात्र माझ्या बरोबरीचा आहे. त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करायला मी तयार आहे’. नंतर भीम आणि जरासंध या दोघांनी गदा घेतल्या आणि युद्ध सुरू झाले. गदा तुटताच कुस्ती सुरू झाली. युद्ध सत्तावीस दिवस चालले. कृष्णाने नंतर स्वत:चे तेज भीम शरीरात प्रविष्ट करून त्याला जरासंधाला मारायची शक्ती आणि युक्तीही सांगितली. युद्ध करताना कृष्णाने झाडाचे एक पान हातात घेऊन फाडून दाखवले. त्याचे तुकडे करून दोन विरुद्ध दिशेला फेकून दिले. त्याप्रमाणे सामर्थ्यवान भीमाने एखादे वस्त्र फाडावे तसे जरासंधाच्या शरीराचे दोन भाग करून दोन बाजूला फेकून दिले. जरासंध मृत झाला.

जरासंध जरी पराक्रमी असला तरी मृत्यूची भीती त्याच्या मनात होती. मनातून ती हाडांमध्ये शिरली. स्वामी सवितानंद म्हणतात, ‘महाभारतामध्ये द्यूत खेळताना शकुनी मामाने चतुरपणे द्युताचे फासे जरासंधाच्या हाडापासून बनवले. जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा धर्मराज युधिष्ठिरकडून फासे अनुकूल पडले की भीम आनंदाने जोरात हसायचा. भीमाचा आवाज एवढा गडगडाटी होता की त्या आवाजाने जरासंधाच्या अस्थींपासून बनवलेले फासे घाबरून उलटे व्हायचे. शकुनीचा डाव असताना फासे प्रतिकूल पडले की भीम पुन्हा हसायचा. त्या आवाजाने फासे उलट, सुलट झाले आणि युधिष्ठिर डाव हरला’.

Advertisement

भारतीय संस्कृतीमध्ये अस्थी या माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. हाडांमध्ये माणसाच्या जगण्याचे संस्कार असतात. व्यवहारात बोलताना माणसे म्हणतच असतात की मी हाडाचा शिक्षक आहे. आमच्या हाडात परंपरेची शिस्त आहे. हाडाची काडे करून आयुष्य उभे केले आहे. कुणाशी तरी हाडवैर आहे. स्वभाव हाडामासी खिळलेला आहे. एखाद्याची हाडे खिळखिळी करण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. एखाद्या उर्मटाशी बोलताना, तुझ्या जिभेला काही हाड आहे का? असे विचारतात. असे अनेक वाक्प्रचार समाजात रूढ आहेत. श्री दत्तमहात्म्य या ग्रंथामध्ये स्वामींनी मदालसाआख्यान रचलेले आहे. त्यात सती मदालसा आपल्या पुत्रांना वेदांत सांगते. आत्मशोधासाठी प्रवृत्त करताना मानवी देहाची नश्वरता पुन्हा पुन्हा सांगते. ती पुत्राला म्हणते, देहाला कल्पनेनेच ठेवलेले नाव तू आपले समजू नकोस. हाडामासांच्या जुडीवर कातडीचे आवरण घातलेले स्थूल शरीर म्हणजे मी अशी भूल तुला पडली आहे. तुझे रूप नित्य, शुद्ध, बुद्ध, आनंदमय आहे. हे हाडांच्या खांबावर उभे केलेले नाड्यांच्या दोरांनी ठिकठिकाणी बांधलेले, रक्ताने लिंपलेले शरीर परमेश्वराने कातडीने मढवले आहे. मनुष्य शरीरात परमज्योतीस्वरूप आत्मा आहे आणि म्हणूनच ते शरीर पवित्र आहे. आत्मा निघून गेला की अस्थी अपवित्र होतात. अस्थिविसर्जन हा एक संस्कार आहे. दाह संस्कारानंतर अस्थी घरी आणू देत नाहीत. ती बाहेर झाडाला टांगून ठेवतात किंवा अस्थिकलश जमिनीत पुरून ठेवतात. हाडाची काडे करून जे घर उभारले, नातीगोती जोपासली ते सारे क्षणात संपून जाते आणि पोरकी हाडे विसर्जनाची वाट बघतात. हाडे माणसाच्या जीवनाचे टळटळीत वास्तव सामोरे आणतात. संतांची गोष्ट मात्र निराळी असते. मृत्यूनंतरही त्यांचा देह पवित्र असतो. त्यामुळे त्यांची हाडेही पवित्र असतात.

संत चोखामेळा यांचे सतत वाचन, मनन करावे असे चरित्र संत नामदेव गाथेमध्ये आहे. संत चोखामेळा हे बांधकाम मजूर होते. मंगळवेढा येथे गावकुसाचे काम सुरू होते. अनेक कामगार त्यावेळी वेठीने कामास लावले होते, त्यात चोखोबाही होते. हे काम सुरू असताना अचानक बांधकाम कोसळले. त्याखाली चोखोबा गाडले गेले. संत नामदेव महाराज म्हणतात, ‘कुसू कडाडले अकस्मात । तया खाली बहुत दूर झाले। चोख्याने अर्पिले प्राण देवा ।’ तो दिवस वैशाख वैद्य पंचमीचा होता. गुरुवार होता. शालिवाहन शके बाराशे साठ प्रमथीनाम संवत्सर होते. चोखोबा विठ्ठलाचे लाडके भक्त. पांडुरंगाने संत नामदेवांना म्हटले, ‘नाम्या त्वा जावे तेथे ।त्याच्या अस्थी इथे घेऊन याव्या ।’ संत नामदेव महाराजांना प्रश्न पडला की चोखोबांच्या अस्थी ओळखायच्या कशा? तेव्हा विठोबा म्हणाला, ‘विठ्ठलनाम जयामध्ये निघे.’ विठ्ठलनाम गाणाऱ्या अस्थी अचळी भरून माझ्यापाशी आणून दे.

संत नामदेवांनी पारखून आणलेल्या अस्थी चक्रपाणीने स्वत:च्या पितांबरात घेतल्या तेव्हा सर्वत्र विठ्ठलनामगजराने अंबर गरजले. संतसमुदाय तो गजर ऐकण्यास जमले. वद्य त्रयोदशी शुक्रवारी विठ्ठलाच्या महाद्वारी विठ्ठलनामाच्या गजरात अस्थिकलश ठेवला. त्यावर पांडुरंगाने पाषाण ठेवला. राही, रखुमाई, सत्यभामा यांनी आरती ओवाळली. संत नामदेव महाराज म्हणतात, ‘चोखा माझा भाव, चोखा माझा जीव। कुळधर्म देव चोखा माझा ।’

सांदिपनी ऋषींच्या गुरुकुलात श्रीकृष्ण राहत असताना त्यांनी आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून काय दिले? याची एक उद्बोधक कथा पू. पांडुरंगशास्त्राr आठवले सांगतात. गुरुदेवांच्या एकुलत्या एक पुत्राला पंचजन्य नावाच्या शक्तिशाली दैत्याने पळवून नेले. त्याकाळी दैत्य सात्विक, बुद्धिशाली मुलांना पळवून नेत असत व चांगल्या मुलांना आपल्या संगतीने वाम मार्गाला लावत. श्रीकृष्णाने पंचजन्य राक्षसाकडे जाऊन गुरूपुत्र परत देण्याविषयी त्याला खूप समजावले तरी त्याने जेव्हा ऐकले नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला मारून टाकले आणि गुरूपुत्राला घेऊन तो आश्रमात परत आला. श्रीकृष्णाने पंचजन्याच्या हाडांचा भुगा करून एक शंख बनवला. त्याचे नाव ‘पांचजन्य.’ तो हातात घेऊन त्याने जगाला सूचना केली की खबरदार! सात्विक वृत्तीच्या माणसांना तामस बनवण्याचा प्रयत्न करू नका. श्रीकृष्ण त्यांच्या सदैव पाठीशी आहे. दुर्बळांना त्रास द्याल तर पंचजन्यासारखी तुमची वाईट स्थिती होईल.

क्षयरोग झालेल्या माणसाने औषधे जर लवकर बंद केली तर क्षयरोगाचे जंतू हुशारपणे हाडांच्या पोकळीत जाऊन लपतात आणि जिवंत राहतात. नंतर संधी पाहून शरीरावर जोरदार आक्रमण करतात. त्या जंतूंजवळ जर एवढी शक्ती असते तर परमेश्वराच्या नामात केवढी बरे असेल? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत की भगवंतांचे नाव हे माणसाच्या पेशीपेशीत रुजले पाहिजे. हाडांवर नामस्मरणाचे संस्कार झाले की मनुष्यदेहाचे सार्थक हे ठरलेलेच आहे. तो प्रेमळ विठोबा भक्तांना जवळ घेण्यासाठी आतुर होऊन उभाच आहे.

स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.