विमानोड्डाणानंतर आता हॉटेलांना बॉम्बची धमकी
गुजरातमधील 10, आंध्रप्रदेशातील 2 हॉटेलांना मेल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या पंधरवड्यापासून विमानांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या दिल्या जात असतानाच आता मोठमोठ्या हॉटेल्समध्ये स्फोट घडवण्याचा इशारा प्राप्त झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. शनिवारी गुजरात आणि आंध्रप्रदेशमधील 12 हॉटेल्सना बॉम्बच्या धमकीचे मेल पाठवण्यात आले होते. मात्र, तपासणीअंती कोणतीही संशयास्पद वस्तू न सापडल्याने तपास यंत्रणांकडून सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला. याप्रकरणी आता सायबर सेलने ई-मेलची चौकशी सुरू केली आहे.
गुजरातमधील राजकोटमधील 10 हॉटेलांना मेल प्राप्त झाला होता. यामध्ये इम्पीरियल पॅलेस, सयाजी हॉटेल, सीझन्स हॉटेल, हॉटेल ग्रँड रिजन्सी या प्रसिद्ध हॉटेल्सचा समावेश आहे. राजकोट पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने हॉटेलची तपासणी केली. तसेच आंध्रप्रदेशातील तिऊपती येथील राज पार्क हॉटेल आणि पै व्हाईसरॉय हॉटेल या दोन हॉटेलांना मेल पाठवण्यात आल्यानंतर दोन्ही हॉटेल्स रिकामी करण्यात आली. बॉम्बनाशक आणि श्वान पथकाने दोन्ही हॉटेलची तपासणी केली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. बॉम्बची धमकी असलेला मेल अफवा पसरवणारा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.