For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळुरातील 44 शाळांना बॉम्बची धमकी

06:22 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
बेंगळुरातील 44 शाळांना बॉम्बची धमकी
Advertisement

ई-मेलमुळे भीतीचे वातावरण : तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरमधील 44 खासगी शाळांना शुक्रवारी सकाळी ई-मेल पाठवून बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. यामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराट पसरली. मात्र, ही धमकी केवळ अफवा असल्याचे नंतर उघडकीस आले, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी दिली. धमकीचे ई-मेल येताच शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिली. बॉम्ब निकामी पथक, श्वानपथकासह पोलिसांनी शाळांमध्ये तपासणी केली. दुसरीकडे पालकांनी शाळेकडे धाव घेत मुलांना घरी नेले. अखेर कोठेही बॉम्ब आढळला नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Advertisement

मुजाहिद्दिन संघटनेच्या नावाने पाठविलेल्या ई-मेलमध्ये घातपात घडविण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यामागे दहशतवाद्यांचा हात असावा, अशी शंका निर्माण झाली आहे. याविषयी पोलिसांनी तपास सुरू केले आहे. अधिक तपासानंतरच स्पष्ट माहिती उपलब्ध होणार आहे. यापूर्वी देखील बॉम्बची धमकी असणारे ई-मेल शाळांना पाठविण्यात आले होते. आता पुन्हा धमकी देण्यात आल्यामुळे बेंगळूरमधील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बसवेश्वरनगर, यलहंका, आनेकल, जिगणी, हेब्बगोडी, सर्जापूर, सदाशिवनगरसह विविध भागातील 60 हून अधिक शाळांना धमकीचा ई-मेल आल्याचे वृत्त शुक्रवारी सकाळी सर्वत्र पसरले. त्यानंतर काही वेळातच पालकांनी मुलांना घरी नेण्यासाठी शाळेकडे धाव घेतली. धमकी न आलेल्या शाळांबाहेरही पालकांची गर्दी झाली. त्यांनी आपल्या मुलांना घरी सोडण्याची मागणी केली. त्यामुळे धमकी न आलेल्या शाळांच्या शिक्षकांनी मुलांना पालकांसोबत घरी पाठवून दिले. यावेळी पालक आणि शालेय कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले.

धमकीविषयी शाळा व्यवस्थापनाकडून माहिती मिळताच पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक, श्वान पथकासह शाळांना भेट देऊन तपासणी केली. मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढून पालकांसोबत पाठवून दिले. कोणत्याही शाळेत बॉम्ब किंवा स्फोटके आढळून आली नाहीत.

सतर्कतेच्या सूचना : सिद्धरामय्या

बेंगळूरमधील शाळांना बॉम्बची धमकी आल्याविषयी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. सर्वत्र सुरक्षा पुरविण्यात आली असून सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्याची सूचना देण्यात आली आहे. पालकांनी घाबरण्याची गरज नाही. यापूर्वीही अशा अफवा पसरवून गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

धमकी देणाऱ्यांचा 24 तासांत शोध घेणार : शिवकुमार

बेंगळूरमधील शाळांना देण्यात आलेली धमकी केवळ अफवा आहे. पालक आणि नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. धमकी देणाऱ्यांचा 24 तासांच्या आत शोध घेण्यात येईल. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मागील वर्षीही अशी घटना घडली होती, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

घटनेची बेदखल नको : कुमारस्वामी

बेंगळूरमधील शाळांना धमकी देणे धक्कादायक आहे. बॉम्बच्या धमकीमुळे मुले, पालक आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शांतता, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी समाजविघातक शक्ती अशी कृत्ये करतात. राज्य सरकारने कोणत्याही कारणास्तव या घटनेची बेदखल करू नये, अशी प्रतिक्रिया निजद नेते एच. कुमारस्वामी यांनी दिली.

Advertisement
Tags :

.