विमानात बाँब ठेवल्याची धमकी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अयोध्येला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्स्पे्रस विमानात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्याने हे विमान तत्काळ उतरविण्यात आल्याची माहिती कंपनीच्या कार्यालयाने दिली आहे. ही घटना मंगळवारी घडली. धमकीचा फोन आला तेव्हा विमान अयोध्येपर्यंत पोहचले होते. त्यामुळे अयोध्या विमानतळावरच ते तातडीने उतरविण्यात आले. नंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, बाँब किंवा अन्य आक्षेपार्ह वस्तू त्यात आढळून आली नाही. नंतर हे विमान दिल्लीला नेण्यात आले असून तेथे त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. तोपर्यंत ते अयोध्येच्या विमानतळाजवळ असलेल्या एका भागात थांबविण्यात आले होते. विमानातून त्वरित सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. बाँब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने विमानाची सखोल तपासणी केली. धमकीचा फोन खोटा असल्याचे स्पष्ट झाले. ज्या क्रमांकावरुन हा फोन आला त्याचा मागोवा घेण्यात येत असून हा खोडसाळपणा करणाऱ्यांना त्वरित पकडले जाईल, असे प्रतिपादन संबंधित अधिकाऱ्यांनी मंगळवारी केले आहे.